संघाची तालिबानशी तुलना: जावेद अख्तर माफी मागा नाही तर… भाजपचा आक्रमक इशारा

बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार, कवी, पटकथा लेखक जावेद अख्तर पुन्हा एकदा भाजपाच्या निशाण्यावर आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना करण्याच्या त्यांच्या वक्तव्याचा भाजपाने जोरदार विरोध केला आहे.

    मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार, कवी, पटकथा लेखक जावेद अख्तर पुन्हा एकदा भाजपाच्या निशाण्यावर आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना करण्याच्या त्यांच्या वक्तव्याचा भाजपाने जोरदार विरोध केला आहे.

    अख्तर यांनी संघाची तालिबान संघटनेशी तुलना केल्याच्या विधानाबद्दल माफी मागावी. अख्तर जोपर्यंत संघाच्या पदाधिकाऱ्यांना हात जोडून माफी मागणार नाही, तोपर्यंत त्यांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा भाजपा आमदार राम कदम यांनी दिला आहे. अख्तर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार करणार असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले आहे.

    काय म्हणाले होते जावेद अख्तर

    “भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंद दल (Bajrang Dal) अफगाणिस्तानमधील तालिबान (Taliban) सारख्याच कट्टरतावादी संघटना आहेत. या संघटनांच्या मार्गात भारताचं संविधान अडसर ठरत आहे. यांना थोडीशी जरी संधी मिळाली तर हे कोणताही संकोच बाळगणार नाहीत. भारतात अल्पसंख्यांक समाजासोबत झालेल्या मॉब लिंचिंगच्या घटना म्हणजे तालिबानसारखं बननण्याआधीची रंगीत तालिम आहे. हे सर्व लोक एकच प्रकारचे आहेत. यांची केवळ नावं वेगळी आहेत.”