अनिल देशमुखांविरोधात तक्रार प्रकरण; राज्य सरकारच्या याचिकेला सीबीआयचा विरोध

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास करण्याचा सीबीआयला पूर्ण अधिकार आहे. असा दावा करत सीबीआयने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावीणीदरम्यान देशमुख आणि राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेला विरोध दर्शविला.

  मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास करण्याचा सीबीआयला पूर्ण अधिकार आहे. असा दावा करत सीबीआयने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावीणीदरम्यान देशमुख आणि राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेला विरोध दर्शविला.

  उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयवतीने दाखल करण्यात आलेल्या गुन्हाविरोधात माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआर मधील दोन परिछेद वगळण्यासाठी राज्य सरकारने याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली.

  सीबीआय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत आहे. काही राज्यात सीबीआय राज्य सरकारच्या परवानगीशिवाय तपास करू शकत नाही, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. मात्र काही दुर्मिळ प्रकरणात सर्वोच्च न्यायालय अथवा उच्च न्यायालय सीबीआयला त्यांच्या अखत्यारित थेट चौकशीचे आदेश देऊ शकते. या प्रकरणातही उच्च न्यायालयाने तशाच पद्धतीचे आदेश दिले असल्याचे सीबीआयच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले आणि दोन्ही याचिकांना जोरदार विरोध केला. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात मूळ तक्रारदार डॉ. जयश्री पाटील यांच्या तक्रारीवर प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसारच आम्ही चौकशीकरून गुन्हा दाखल केला आहे, असा दावा करत याचिका फेटाळण्याची विनंतीही केली.

  दरम्यान, अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी यापूर्वी याचिका दाखल करणार्‍या अँड. घनश्याम उपाध्याय आणि प्राध्यापक मोहन भिडे यांच्यावतीने हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. त्याची न्यायालयाने गंभीर दखल घेत रितसर याचिका दाखल करण्याचे निर्देश देत सुनावणी १८ जूनपर्यंत तहकूब केली.

  राज्य सरकार आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे रोमिओ ज्युलिएटसारखे प्रेमसंबंध आहेत. या प्रकरणात अनेक गोष्टी उघड होणार असल्याने अनिल देशमुख तसेच वाझे यांना वाचविण्याच्या हेतूनेच सीबीआयकडून तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुळ तक्रारदार डॉ. जयश्री पाटील यांनी सुनावणीदरम्यान केला.

  हे सुद्धा वाचा