रोहा तालुक्यात कोरोना रुग्ण सापडत असल्याने चिंतेचे वातावरण

सुतारवाडी - २३ मार्च ला लॉकडाऊन झाल्यानंतर जगात सर्वत्र कोरोनाने डोके वर काढून अनेकांना गिळंकृत केले. त्यानंतर मुंबई तसेच अन्य शहरात अहंकार माजवला. लाखो लोकांची रोजीरोटी बंद केली आणि

 सुतारवाडी – २३ मार्च ला लॉकडाऊन झाल्यानंतर जगात सर्वत्र कोरोनाने डोके वर काढून अनेकांना गिळंकृत केले. त्यानंतर मुंबई तसेच अन्य शहरात अहंकार माजवला. लाखो लोकांची रोजीरोटी बंद केली आणि कोट्यवधींचा फटका आजही कंपन्या,  व्यापारी तसेच अनेकांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. रायगड जिल्ह्यात पनवेल वगळता अन्य तालुक्यात कोरोनाने  शिरकाव केला नव्हता मात्र आता माणगाव,  मुरुड,  अलिबाग,  रोहा तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषता रोहा तालुक्यात नगरपालिका आणि ग्रामपंचायतींनी अधिक काटेकोरपणे शासनाच्या नियंत्रणाचे पालन करून नागरिकांना ही दक्षता घ्यायला सांगितली होती. 

ग्रामस्थांनी शासनाचे नियम पाळून आपली वैयक्तिक काळजी घेत होते. मात्र रोहा तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने ग्रामीण भागातील नागरिक चिंतेत आहेत. एनवहाळ -३, भालगाव-२, पालेखुर्द-१, सुखदरवाडी घोसाळे-१ या ठिकाणी सापडलेल्या रुग्णांमुळे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई शहरातून तसेच ठाणे आणि पनवेल येथून आलेल्या व्यक्ती द्वारे इतरांना कोरोनाची लागण होत असल्याचे उघड होत आहे. रोहा तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात १५ दिवसांपूर्वी मुंबई,  ठाणे, सुरत, नालासोपारा, धारावी शहरातून नोकरीनिमित्त गेलेले कुटुंब आपापल्या गावी येऊन क्वारंटाईन झालेले आहेत. मात्र त्यांची तपासणी कोणत्या प्रकारे झाली हे गुलदस्त्यात आहे. 

यामुळे ग्रामीण भागात शंकेची पाल चुकचुकत आहे. ग्रामीण भागात एवढी दक्षता घेऊन सुद्धा कोरोनाचे रुग्ण कसे काय सापडत आहेत याचे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. काही ठिकाणी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. सुरुवातीला सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळले गेले होते. त्यानंतर नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे अनेक ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगची  पायमल्ली होताना प्रत्यक्ष पहावयास मिळत आहे. पोलीस, शिक्षक, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते स्वतःचा जीव धोक्यात घालून कुटुंबाची पर्वा न करता घराबाहेर पडून कोरोनाशी चार हात करत आहेत. परंतु जनतेने सुद्धा याची दखल घेतली पाहिजे तरच कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही. माणगाव आणि रोहा येथे दिवसेंदिवस रुग्ण सापडत असल्यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.