व्हिडिओकॉनचे प्रवर्तक वेणूगोपाल धूत यांना सशर्त जामीन; ५ लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर

आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन कंपनीला ३०० कोटींचे कर्ज दिले होते. ७ सप्टेंबर २००९ रोजी या कर्जाचा परतावा करण्यात आला होता. त्याच्या एकच दिवसानंतर म्हणजे ८ सप्टेंबर २००९ रोजी या रकमेतील ६४ कोटींची रक्कम नुपॉवर रिन्युएबल्स या व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजमधील एका कंपनीला देण्यात आली होती.

    मुंबई : आयसीआयसीआय बँक गैरव्यवहार प्रकरणात शुक्रवारी (पीएमएलए) विशेष सत्र न्यायालयाने व्हिडिओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांना ५ लाखांच्या वैयक्तिक जातमुचालक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.

    आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन कंपनीला ३०० कोटींचे कर्ज दिले होते. ७ सप्टेंबर २००९ रोजी या कर्जाचा परतावा करण्यात आला होता. त्याच्या एकच दिवसानंतर म्हणजे ८ सप्टेंबर २००९ रोजी या रकमेतील ६४ कोटींची रक्कम नुपॉवर रिन्युएबल्स या व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजमधील एका कंपनीला देण्यात आली होती.

    याच प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने आयआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉन ग्रुप प्रमोटर वेणूगोपाल धूत यांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

    याप्रकरणी वेणूगोपाल धूत यांनी सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर शुक्रवारी न्या. ए ए नांदगावकर यांच्या समोर सुनावणी पार पडली. त्याची दखल घेत त्यांना पाच लाखांच्या जातमुचलक्यावर तसेच ईडीला तपासात सहकार्य करावे, चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहावे, देश सोडून जाऊ नये आणि पासपोर्ट पोलिसांकडे जमा करणे अशा अटीशर्तीवर जामीन मंजूर केला. या प्रकरणी चंदा कोचर यांना जामीन मंजूर झाला असून त्यांचे पती दीपक कोचर हे मात्र अद्यापही कारागृहात आहेत.