मामाच्या साखर कारखान्यावर ED कडून जप्तीची कारवाई; व्यवहाराबाबत अजित पवारांचा खुलासा

जरंडेश्वर साखर कारखान्यात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याने बँकेचे थकीत कर्ज न भरल्याने कारखाना जप्त करण्यात आला होता. माजी आमदार आणि महलूसलमंत्री शालिनीताई पाटील या कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन होत्या. साताऱ्यातील कोपरगाव येथील जरंडेश्वर साखर कारखाना थकीत कर्जामुळे लिलावात काढला होता.

    मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र घाडगे यांच्या ताब्यात असलेला साखर कारखाना जप्त केला आहे. जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीची ही कारवाई उपमुख्यमंत्री पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. यावर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबईमध्ये सुंदरबाग सोसायटीने 2007 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टने त्या साखर कारखान्यांना एक वर्षाची मुदत देण्यास सांगितले होते. एका वर्षात जर त्यांनी रक्कम न भरता पैसे थकवले तर ते विक्रीला काढण्याच्या सूचनाही मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या होत्या. या निर्देशानुसार, कायदेशीर प्रक्रिया राबवून टेंडर काढून विक्री करण्यात आली. त्या 14 साखर कारखान्यांमध्ये जरंडेश्वर साखर कारखान्याचा देखील समावेश होता असा खुलासा अजित पवारांनी केला आहे. ईडीला चौकशी करण्याचा संपूर्ण अधिकार आहे असेही ते म्हणाले.

    जरंडेश्वर साखर कारखान्यात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याने बँकेचे थकीत कर्ज न भरल्याने कारखाना जप्त करण्यात आला होता. माजी आमदार आणि महलूसलमंत्री शालिनीताई पाटील या कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन होत्या. साताऱ्यातील कोपरगाव येथील जरंडेश्वर साखर कारखाना थकीत कर्जामुळे लिलावात काढला होता.

    शिखर बँकेने या कारखान्याचा लिलाव केला होता. मात्र, हा लिलाव हेतूपरस्कर असल्याचा आरोपही करण्यात आला होता. ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल एक कोटींहून कमी होती त्या कंपनीने हा 60 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा साखर कारखाना खरेदी केला होता. या संपूर्ण प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याने ईडीने ही कारवाई केली आहे. याबाबत अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आपला गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे.