होमक्वारंटाइनची अट काढल्यास गोंधळ; अधिकाऱ्यांचा विरोध, व्यक्त केली नाराजी

राज्यातील 18 जिल्ह्यात अद्यापही कोरोना आकडेवारीचा धुमाकूळ सुरू आहे. सरासरीपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या या जिल्ह्यांमध्ये गृहविलगकरण पूर्ण बंद करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यानी दिल्यानंतर त्यावर वैद्यकीय क्षेत्र आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवत नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाच्या दोन्ही बाजूंचे परिणाम योग्य होणार नाहीत, अशी भूमिका डॉक्टरांनी व्यक्त केली. त्यामुळे सरसकट गृहविलगीकरणाची सुविधा राहणार नसली तरी गृहविलगीकरणाची सुविधा बंद होणार नाही असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

    मुंबई : राज्यातील 18 जिल्ह्यात अद्यापही कोरोना आकडेवारीचा धुमाकूळ सुरू आहे. सरासरीपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या या जिल्ह्यांमध्ये गृहविलगकरण पूर्ण बंद करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यानी दिल्यानंतर त्यावर वैद्यकीय क्षेत्र आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवत नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाच्या दोन्ही बाजूंचे परिणाम योग्य होणार नाहीत, अशी भूमिका डॉक्टरांनी व्यक्त केली. त्यामुळे सरसकट गृहविलगीकरणाची सुविधा राहणार नसली तरी गृहविलगीकरणाची सुविधा बंद होणार नाही असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

    सुविधा बंद होणार नाही

    या निर्देशावर आलेल्या प्रतिक्रिया लक्षात घेता आरोग्यमंत्रालयाने राज्यातील ज्या जिल्ह्यांचा साप्ताहिक (पॉझीटिव्हीटी) रूग्णसंख्या दर राज्य सरासरीपेक्षा जास्त आहे तिथे ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरसकट गृहविलगीकरणाची सुविधा राहणार नसली तरी गृहविलगीकरणाची सुविधा बंद होणार नाही असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

    दिवसभर निर्णयाविरोधात चर्चा

    याबाबत मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, राज्यातील ‘रेड झोन’मध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण बंद करून बाधितांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातल्या कोविड केअर सेंटर्सची संख्या वाढवण्याचेही निर्देश देण्यात आल्याचे बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र दिवसभर या निर्णयाविरोधात डॉक्टरांमध्ये व कोविड व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्येही चर्चा सुरू होती. या निर्णयाचा फेरविचार करायला हवा, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. दरम्यान, या निर्णयाचा विपरीत परिणाम कष्टकरी वस्त्यांमध्ये होईल. ग्रामीण भागामध्ये संसर्गाचा प्रसार झाला, तरीही या समूहामध्ये लसीकरणाची तसेच चाचण्या करून घेण्याची मानसिकता अद्याप झालेली नाही. घरे लहान असली तरीही कोविड केअर केंद्रात जाऊन दाखल होण्याची भीती लोकांच्या मनात आहे. गृहविलगीकरणाची सुविधा काढून टाकली, तर या व्यक्तींकडून चाचण्या करून घेण्याचे प्रमाण कमी होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

    रुग्णालयांच्या एकूण व्यवस्थेवर ताण येईल

    आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या उतरणीला लागली आहे. मात्र, पुन्हा ही संख्या वाढली, तर रुग्णालयांच्या एकूण व्यवस्थेवर ताण येईल. त्याचे नियोजन कसे करणार? ज्या रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत, मात्र ते पॉझिटिव्ह आहेत. तसेच वैद्यकीय उपचारांचा खर्च करू शकतात, असे रुग्णही रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचा आग्रह धरतील असे ते म्हणाले. दिवसभर या निर्णयाविरोधात वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा झाल्यानंतर संध्याकाळी गृहविलगीकरणाची सुविधा सुरू राहील, असे आरोग्यविभागाकडून घोषित करण्यात आले.