‘राज्यसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेत अखेर भाजपाने परंपरा राखली’ काँग्रेस नेत्यांनी मानले आभार

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून एखाद्या नेत्याच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे, याचा उल्लेख काँग्रेस नेत्यांनी चर्चेत केला. काँग्रेस नेत्यांच्या आवाहनाचा विचार करून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी विचार विनिमय केला आणि भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा निर्णय घेतला.

    मुंबई :  महाविकास आघाडी विरोधात दररोज टोकाच्या विरोधाची भाषा करणा-या भाजपने राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस पक्षाने केलेल्या आवाहनाचा विचार करून संजीव उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यामुळे देशात राज्यातील दुर्मिळ राजकीय प्रथा परंपरा पुन्हा एकदा अनुभवास आली आहे.

    उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपाच्या उमेदवाराने माघार घ्यावी, असे आवाहन केले होते. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून एखाद्या नेत्याच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे, याचा उल्लेख काँग्रेस नेत्यांनी चर्चेत केला. काँग्रेस नेत्यांच्या आवाहनाचा विचार करून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी विचार विनिमय केला आणि भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या काँग्रेस नेत्या मा. रजनी पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

    कॉंग्रेसने भाजप नेत्यांचे मानले आभार!

    केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या एका रिक्त जागेसाठी ४ ऑक्टोबरला मतदान घेण्याचे निश्चित केले होते. मात्र आता ही जागा बिनविरोध झाल्याने मतदान घेण्याची आवश्यकता राहिली नाही. असे असले तरी आता महाविकास आघाडीच्या विनंतीला मान देवून भाजपने माघार घेतल्याने कॉंग्रेस नेत्यांनी भाजप नेत्यांचे आभार मानले आहेत. नव्याने खासदार होणा-या रजनी पाटील या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या असून त्या यापूर्वी देखील राज्यसभेच्या खासदार राहिल्या आहेत. सध्या जम्मू आणि काश्मीरच्या काँग्रेस प्रभारी असलेल्या रजनी पाटील यांना ठाकरे सरकारने १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत विधान परिषदेवर नियुक्तीसाठी संधी दिली होती. मात्र त्या यादीत त्यांचे नाव राज्यपालांच्या मंजूरीच्या प्रतिक्षेत असतानाच आता त्या राज्यसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यापूर्वी रजनी पाटील यांनी १९९६ साली बीडमधून लोकसभा निवडणूक जिंकली आहे.