शरद पवारांची भूमिका काँग्रेसने सकारात्मक पद्धतीने घेतली पाहिजे; राष्ट्रवादीचे प्रवक्ता नबाब मलिक यांचा सल्ला

  मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ता नबाब मलिक यानी अध्यक्ष शरद पवार यांची कॉंग्रेस बाबतची भूमिका काँग्रेसने सकारात्मक पद्धतीने घेतली पाहिजे, असा सल्ला माध्यमांशी बोलताना दिला आहे. ते म्हणाले की, देशातील सर्व विरोधीपक्षांना एकत्र आणण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका आहे.

  काँग्रेसची अवस्था वैभव गमावलेल्या जमीनदारा आहे, अशी टीपणी पवार यांनी केली होती. त्याला काँग्रसेचे ज्येष्ठ नेते व  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना माध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी काँग्रेसलाच पवारांची टीका सकारात्मक पद्धतीने घेण्याचा सल्ला दिला.

  बेछूट व बिनबुडाचे आरोप करण्याचा सोमैय्यांचा उद्योग

  यावेळी बोलताना मलिक म्हणाले की, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बेछूट व बिनबुडाचे आरोप करण्याचा उद्योग सुरू केला आहे.  ज्या संस्थेची किरीट सोमय्या बदनामी करत होते त्या संस्थेने सोमय्या यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला असून शिवडी कोर्टाने तसे आदेश पारित केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

  कोल्हापूरात दिवाणी व फौजदारी दावे

  विनाकारण बदनामी करणार्‍या लोकांच्या विरोधात कायद्याने कारवाई करता येते हे लोकांच्या लक्षात आले असून ही आता सुरुवात आहे असेही नवाब मलिक म्हणाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही किरीट सोमय्या यांच्या विरोधात कोल्हापूर कोर्टात दिवाणी व फौजदारी असे दोन्ही स्वरुपाचे दावे दाखल करण्याचे स्पष्ट केले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

  एक मंत्री कोण? ते सांगा. असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. तसेच कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुणी अशा अफवा पसरवत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. याविषयीदेखील त्यांनी निश्चिंत राहावे.

  - संजय राऊत, खासदार, शिवसेना