काँग्रेस कार्यकर्त्यांनी गरीब कुटुंबांना दत्तक घेऊन स्वतःचा व त्यांच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा : नाना पटोले

    मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने कोरोनाची परिस्थिती अत्यंत निष्काळजीपणे हाताळली, आतापर्यंत मोठे नुकसान झाले आहे. सध्यातरी लसीकरण हाच यावरील प्रभावी उपाय ठरत आहे. पण केंद्र सरकारने आपल्या देशातील लस दुसऱ्या देशांना पाठवली. ज्या पाकिस्तानला नेहमी शिव्या देता त्यांनाही ४.५ कोटी लसी दिल्या. एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही, अशी टिका  कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले यांनी केली आहे. राज्य सरकारच्या मोफत लसीकरणाला हातभार लावण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या शेजारच्या गोरगरिब कुटुंबांना दत्तक घेऊन स्वतःचा व त्या कुटुंबांच्या लसीकरणाचा खर्च उचलून ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

    लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

    महाराष्ट्र दिनानिमित्त प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर येथे नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, कोरोना हे देशावर आणि राज्यावर आलेले अभूतपूर्व संकट आहे. दररोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या पहावत नाही. या संकटाचा सामना महाराष्ट्र विकास आघाडी सरकार वर्षभरापासून मोठ्या धैर्याने करत असून केंद्र सरकारने आपली जबाबदारी झटकली असली तरी महाराष्ट्र सरकारने मात्र जनतेला वाऱ्यावर न सोडता १८ वर्षावरील सर्वांच्या मोफत लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतु राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता मदतीचा ओघ वाढला पाहिजे.

    दरम्यान काँग्रेस आमदारांचे एक महिन्याचे वेतन व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ५ लाख रुपये अशी मदत मुख्यमंत्री सहायता निधीला केली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात कोविड सहायता केंद्राची स्थापना करून गरजू रुग्णांना बेड्स मिळवून देणे,  वैद्यकीय सहायता पुरवणे याबरोबरच रक्तदान शिबिरे आयोजित करून मदतीचे कार्य सुरु ठेवले आहे. लसीकरणाचा खर्च मोठा आहे त्याला हातभार म्हणून काँग्रेस कार्यकर्ते आपल्या परिसरातील गरीब कुटुंबांना दत्तक घेऊन स्वतःच्या व त्या कुटुंबाच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. या सोबतच नोंदणी करून लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत काँग्रेस कार्यकर्ते लोकांना मदत करणार आहेत.