व्यावसायिक अविनाश भोसले यांना दिलासा कायम; ३१ मार्चपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे न्यायालयाचे ईडीला निर्देश

विदेशी चलन प्रकरणात पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 'ईडी'ने चौकशी करत आहे. त्यासंदर्भात ईडीने अविनाश भोसले यांना समन्स बजावत त्यांच्या 'अबिल हाउस' या कार्यालयावर छापे टाकले होते.

    मुंबई : परदेशी विनिमय व्यवस्थापन (फेमा) कायद्याचे उल्लंघन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या कचाट्यात अडकलेले बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांच्या मुलगा अमित यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा कायम ठेवला आहे. ३१ मार्चच्या पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश ईडीला दिले आहेत.

    विदेशी चलन प्रकरणात पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ‘ईडी’ने चौकशी करत आहे. त्यासंदर्भात ईडीने अविनाश भोसले यांना समन्स बजावत त्यांच्या ‘अबिल हाउस’ या कार्यालयावर छापे टाकले होते. मात्र,या समन्सला अविनाश भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

    या याचिकेवर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, भोसले चौकशीदरम्यान सहकार्य करत आहेत ना?, असा सवाल खंडपीठाने सरकारी वकिलांना विचारला होता. त्यावर निव्वळ चौकशीला हजेरी लावणे म्हणजे सहकार्य करणे असे होत, असे ॲड. हितेन वेणेगावकर यांनी खंडपीठाला सांगितले.

    तसेच पुढील सुनावणीला अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंहच उत्तर देतील असेही न्यायालयाला सांगितले. त्याची दखल घेत अविनाश भोसले आणि त्यांच्या मुलगा अमित यांना दिलेला दिलासा कायम ठेवत पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश ईडीला देत खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.