डीएसकेंची पुतणी सई वांजपे यांना दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाकडून अटी शर्तीसह जामीन मंजूर

सई वांजपे यांच्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असून सदर जागेचे सर्व व्यवहार हे सहआरोपी बघत होते. त्या जागेच्या खरेदी विक्री संदर्भातील कुठल्याही व्यवहारावर अथवा धनादेशावर सई वांजपे यांची सही नाही.

    मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सध्या तुरुंगात असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्या सहआरोपी आणि पुतणी सई वांजपे यांना मुंबई उच्च न्यायालयाने १ लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर विविध अटी आणि शर्तीसह जामीन मंजूर केला.

    फुरसुंगी येथील शेतकऱ्यांकडून त्यांची जमीन कमी भावात विकत घेऊन ती जमीन डीएसके यांच्या कंपनीला जास्त भावात विकून त्यात नफा कमवण्याच्या आरोपावरून सई वांजपे यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र ठेवण्यात आले आणि अटकही करण्यात आली होती. त्यानंतर सई यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्या जामीन अर्जावर न्या. नितीन सांब्रे यांच्यासमोर नुकतीच सुनावणी पार पडली. तेव्हा, सई वांजपे यांच्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असून सदर जागेचे सर्व व्यवहार हे सहआरोपी बघत होते. त्या जागेच्या खरेदी विक्री संदर्भातील कुठल्याही व्यवहारावर अथवा धनादेशावर सई वांजपे यांची सही नाही.

    या संदर्भात तपास यंत्रणेकडे पुरेसा पुरावा नाही. तसेच सई यांना एक लहान मुलगा आहे आणि त्या दोन वर्षापासून तुरुंगात आहेत म्हणून त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा अशी विनंती त्यांच्यावतीने ॲड. अनिकेत निकम यांनी केली. त्यांची बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने १ लाखांच्या जातमुचलक्यावर सई यंना जामीन मंजूर केला. तसेच याचिकाकर्त्यांनी तपास यंत्रणा पुढील तपासात सहकार्य करावे, पुराव्याशी छेडछाड करू नये किंवा साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे संपर्क अथवा दबाव आणू नये, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणात अनावश्यक कारणांसाठी स्थगितीची मागणी करू अशा अटी शर्तींवर जामीन मंजूर केला.