मुंबई अंधारात जाण्यामागे घातपात?

सोमवारी मुंबई अंधारात का बुडाली, याचा तपास सुरू असतानाच ऊर्जामंत्र्यांच्या नव्या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. ऊर्जामंत्र्यांनी घातपाताची शक्यता वर्तवल्यामुळे तपासाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोमवारी मुंबई आणि नवी मुंबईचा वीजपुरवठा खंडित होण्यामागे (Power cut) घातपाताचा कट (Conspiracy)  असू शकतो, असे खळबळजनक विधान महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (State power minister Nitin Raut) यांनी केले आहे. ट्विट करून त्यांनी ही शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी अडीच ते तीन तास तर उपनगरांमध्ये काही भागांत आठ ते नऊ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. हा प्रकार का घडला, त्याला कुठले घटक कारणीभूत होते, दुर्घटनेला जबाबदार कोण या सगळ्याची कसून चौकशी (inquiry) करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

      दुर्घटनेची तांत्रिक चौकशी एका बाजूला सुरू असताना खुद्द ऊर्जामंत्र्यांनीच घातपाताची शक्यता व्यक्त केल्यामुळे खळबळ उडाली आहे.


“महापारेषणच्या कळवा पडघा केंद्रातील सर्कीट क्रमांक एकची देखभाल सुरू असल्यामुळे सर्व भार हा सर्किट दोनवर टाकण्यात आला होता. नेमका त्याच सर्किटमध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबई आणि उपनगरांतला वीजपुरवठा खंडित झाला’’ अशी माहिती ऊर्जामंत्र्यांनीच दिली होती. त्या दृष्टीने यंत्रणा तपास करत होत्या. आता ऊर्जामंत्र्यांनी दिलेल्या घातपाताच्या संकेतांनंतर तपासाची चक्रेदेखील फिरण्याची शक्यता आहे.