संत नामदेव महाराजांच्या जन्मगावी स्मारक बांधकाम कामाला गती देण्यात यावी: अमित देशमुख

संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या साडेसातशे वर्षानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असताना नामदेव महाराजांचे जन्मगाव असलेल्या नरसी नामदेव येथे त्यांचे स्मारक बांधण्याच्या कामाला गती देण्यात यावी असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

    मुंबई: संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या साडेसातशे वर्षानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असताना नामदेव महाराजांचे जन्मगाव असलेल्या नरसी नामदेव येथे त्यांचे स्मारक बांधण्याच्या कामाला गती देण्यात यावी असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. संत नामदेव महाराजांची ७५० वी जयंती साजरा करण्यासंदर्भातील आढावा बैठक आज मंत्रालयात आयेाजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक संचालक बिभीषण चावरे, पुरातत्व संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे आदी उपस्थित होते.

    संत नामदेव महाराजांचे नाव महाराष्ट्राच्या संत परंपरेत अत्यंत आदराने घेतले जाते. त्यामुळे संत नामदेव महाराजांची ७५० वी जयंती महाराष्ट्रात साजरा करीत असताना त्यांचे स्मारक होणे, आवश्यक असून या कामाला गती देण्यात यावी. याशिवाय वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. यामध्ये संत नामदेव महाराजांच्या चरित्रावरील नाटके, भक्ती महोत्सव, अभंगवाणी अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असेल. विशेष म्हणजे हे कार्यक्रम महाराष्ट्रातील मुंबईसह पंढरपूर, देहू, पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात यावेत, अशी माहिती देशमुख म्हणाले