बाप्पाच्या सजावटीचे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांनी बाजार फुलले

चौसष्ट कला आणि चौदा विद्यांचे दैवत म्हणजे गणपती. लाडका बाप्पाचे आगमन गुरुवारी होत आहे. त्यासाठी खरेदीसाठी मुंबईकारांची सध्या लगबग सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील विविध भागात दादर, लालबाग, परेल, गिरगाव, वरळी आदी भागात गणपती बाप्पांचे मखर, सजावटीसह दिवे, गौरींच्या मुखवट्यांचे साहित्य, पूजेचे साहित्य, इलेक्ट्रानिक वस्तू इत्यादी खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या आहेत

    मुंबई : कोरोनाचे संकट अजून कायम आहे, तसेच कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेता, यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे राज्य शासनाने म्हटले आहे. खरेदीसाठी बाजारांमध्ये गर्दी करु नका, जर आपण गर्दी केली तर कोरोनाला आमंत्रण देऊ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. गणपती अगदी चार दिवसांवर येऊन ठेपला असताना, बाजारात गणपती सणाचे साहित्य करण्यास मात्र लोकांची गर्दी होताना पाहयला मिळत आहे. २०२० वर्षापासून कोरोनाने जगभरात थैमान घातल्यामुळं मागील वर्षीसुद्धा गणपतीसणासह अनेक सण अगदी साध्या पदधतीने साजरे करण्यात आले. कोरोनाच्या आधी दरवर्षी सजावटीच्या वस्तू, मखर, कंठ्या, मुकुट व हार या गोष्टींनी बाजार फुललेला असायचा, मात्र मागील वर्षापासून कोरोनाच्या भीतीमुळं काही ग्राहकांनी सजावटीच्या वस्तू आणि मखर खरेदीकडे पाठ फिरवली आहे. लोकांनी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साधनांमध्ये सजावट व मखर तयार केले आहेत. मागील वर्षापासून कोरोनामुळं कंठी व हिरेजडित मुकुट साकारण्यासाठी लागणारे हिरे व मणी तसेच विविध वस्तूंची इतर राज्यांतून व देशांमधून आयात न झाल्याने मखर सजावट करणाऱ्या अनेक कलाकारांना याचा फटका बसल्याचे समोर आलं आहे.

    चौसष्ट कला आणि चौदा विद्या यांचे दैवत म्हणजे गणपती. लाडका बाप्पाचे आगमन गुरुवारी होत आहे. त्यासाठी खरेदीसाठी मुंबईकारांची सध्या लगबग सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील विविध भागात दादर, लालबाग, परेल, गिरगाव, वरळी आदी भागात गणपती बाप्पांचे मखर, सजावटीसह दिवे, गौरींच्या मुखवट्यांचे साहित्य, पूजेचे साहित्य, इलेक्ट्रानिक वस्तू इत्यादी खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या आहेत, त्यामुळं मुंबईकरांची खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळल्याचे चित्र आहे. बाप्पाच्या मखराभोवती आकर्षक रोषणाईसाठी दिव्यांना विशेष महत्व आहे. यंदा माळांशिवाय एलईडी दिव्यांचे घुमट, डान्सिंग दिवे, एलईडी फोकस, एलईडी दिव्यांची पेन्सिल, ओम, श्री व स्वस्तिक किंवा गणपतीच्या आकारातील एलईडी दिवे बाजारात आले आहेत. त्यांना मोठी मागणी दिसून येत आहे. साधारण ८० रुपयांपासून ते २ हजार रुपयांपर्यंतचे साहित्य बाजारात आले आहे. ही सर्व रोषणाई एलईडी दिव्यांची असल्याने ऊर्जाबचत होते. १०० ते ५०० रुपयांच्या रोषणाईला सर्वाधिक मागणी आहे. पूजेच्या साहित्यासाठी दादर बाजारपेठ फुलली, गणेशोत्सवामुळे पूजेच्या साहित्याला मोठी मागणी आहे. गणेशोत्सवासाठी लागाणाऱ्या पूजेच्या साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली. गोकुळाष्टमी पासून पूजेच्या साहित्यांची खरेदी चांगली सुरु झाली आहे. पूजेच्या वस्तू आणि साहित्यात थोडाफार प्रमाणात भाव वाढ सुद्धा झाली आहे. मात्र याचा परिणाम खरेदीवर होणार नाही. तसेच ग्राहकांची संख्या वाढली आहे त्यामुळे यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत व्यवसाय चांगला असेल अशी प्रतिक्रिया दुकानदारांनी दिली.

    गणेशोत्सव काळात कापूर, कंठी, लाल कपडा रुमाल, अगरबत्ती, धूप, लाकडी पाठ, समई, निरंजन, पितळेचे ताठ, हळद, कुंकू, अबीर, गुलाल, रांगोळी या वस्तूंना मोठी मागणी असते. या वर्षी कापूराचा साधारण १००० रुपये किलो एवढा दर आहे. तर कंठी ४०-४५ रुपयापासून ७०० रुपयापर्यंत आहेत. अगरबत्ती १०० रुपयापासून १००० हजारपर्यंत भाव आहेत. तर धूप ४०० रुपये किलो, समई ६०० पासून २५ हजारपर्यंत, लाकडी पाट १०० रुपयापासून पुढे, पितळेचे ताठ १०० रुपयापासून पुढे असे सध्या भाव साहित्यांचे बाजारांत पाहयला मिळत आहेत. त्यामुळं एकिकडे कोरोनाटे सावट असताना, दुसरीकडे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लोकांनी बाजारात गर्दी केल्याचे चित्र पाहयला मिळते.