pravin darekar

आपत्कालीन परिस्थितीत कशावर खर्च करायचा? कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे याचे भान ठेवायला हवे. पण कंत्राटदारांचे हित आणि त्यातून मिळणारा मलिदा याकडे यावर सरकारचे लक्ष असल्याची टीकाही दरेकर यांनी केली

मुंबई: राज्यात कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने अनेक विकास कामांना कात्री लावलेली असतानाच दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीवर गेल्या वर्षभरात ९० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आलेला असतानाच मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च करणे सरकारच्या संवेदनाहिन पणाचे लक्षण आहे. हे सरकार कंत्राटदारधार्जिणे झाले आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. बंगल्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर झालेल्या खर्चापेक्षा अधिक खर्च या बंगल्यांवर करण्यात आला आहे. जलसंपदा विभाग, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बंगल्यांवर सर्वाधिक खर्च करण्यात आला आहे. आरोग्य विभागावर जी तरतूद आहे. त्यात पन्नास टक्केही खर्च करण्यात आलेला नाही. मात्र, बंगल्यांवर सर्वाधिक खर्च करण्यात आला आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.
आपत्कालीन परिस्थितीत कशावर खर्च करायचा? कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे याचे भान ठेवायला हवे. पण कंत्राटदारांचे हित आणि त्यातून मिळणारा मलिदा याकडे यावर सरकारचे लक्ष असल्याची टीकाही दरेकर यांनी केली.

बंगल्यांवर ९० कोटी खर्च
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगल्यावर ३ कोटी २६ लाख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर १ कोटी ७८ लाख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सातपुडा बंगल्याच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ३३ लाख, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा रॉयल स्टोन बंगलावर दोन कोटी २६ लाख, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा मेघदूत बंगल्यावर १ कोटी ४६ लाख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या चित्रकूट बंगल्यावर ३ कोटी ८९ लाख, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या शिवनेरी बंगल्यावर १ कोटी ४४ लाख, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर १ कोटी ६७ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या b३ या बंगल्यावर ३ कोटी ४० लाख, नितीन राऊत यांच्या पर्णकुटीवर १ कोटी २२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अग्रदूत आणि नंदनवन या दोन्ही बंगल्यांवर दोन कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.