निवडणूक आयोगाचा वादग्रस्त कंत्राटदार, भाजप आयटी सेलसदस्य देवांग दवे उपमुख्यमंत्र्यासोबत!

समूह माध्यमांत चर्चांना उधाण!

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाजपच्या नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यावरून वारंवार संभ्रमीत करणा-या बातम्या येत असताना आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्या एका व्टिट मुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना सारवासारव करण्याची वेळ आली. भाजप सरकारच्या काळात निवडणूक आयोगाच्या समूह माध्यमांचे कंत्राट देण्यात आलेल्या भाजप आयटी सेलच्या देवांग दवे यांचा मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य काही मंत्र्यांच्या भेटीची छायाचित्र उपमुख्यमंत्र्याच्या व्टिटमधून व्हायरल झाली आहेत. ”कोरोनाविरुद्धच्या लढाईत पहिल्या फळीत लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांसाठी मुंबईतील पवई रोटरी क्लबच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ‘एन 95 मास्क’, ‘वॉशेबल मास्क’, ‘पीपीई किट’, ‘सॅनिटाईझर’ आदी उपयुक्त वस्तू सुपूर्द करताना पवई रोटरी क्लबच्या अध्यक्ष गिरीजाताई देशपांडे व त्यांचे सहकारी. असे या व्टिट मध्ये म्हटले आहे. मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड व रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.” यात देवांग दवे यांच्या उपस्थितीमुळे राष्ट्रवादीचे भाजप कनेक्शन काय आहे असा सवाल काही नेटिजन्सनी केला आहे.

त्यामुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटचा खुलासा करत ‘तो देवांग दवे आहे हे माहीतच नव्हते’ असे सांगत संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. आव्हाड यांनी तातडीने खुलासा केला तरी अद्याप अजित पवार यांनी मात्र या प्रकारावर सूचक मौन पाळले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान सभा निवडणुकीच्या काळात सोशल मीडियाचे काम भाजप पदाधिकाऱ्यांशी संबंधित कंपनीला दिल्याचा गंभीर आरोप साकेत गोखले यांनी ट्विटरवर केला होता. त्यांच्या माहितीनुसार भाजप पदाधिकारी आयटी सेल सांभाळणाऱ्या देवांग दवे याच्या कंपनीला निवडणूक आयोगाने काम दिले होते कारण त्याच्या कंपनीचा पत्ता आणि निवडणूक आयोगाच्या कंत्राटदारांचा पत्रा एकच आहे. विशेष म्हणजे सोशल सेंट्रल या ज्या कंपनीला काम दिले त्या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत भाजप आहे. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काही दिवसांपूर्वीच केली होती.