शिक्षणाच्या आयचा घो अन् कोरोनाच्या नानाची टांग ; पूर्ण शुल्क न भरल्यास प्रवेश रद्द करण्याचे शाळेचे पत्र

देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गतवर्षी कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे अनेक पालकांना शुल्क भरणे शक्य झाले नाही.

  • पालकांमध्ये भीतीचे वातावरण
  • शाळेच्या मनमानीविरोधात युवासेनेची शिक्षणमंत्र्यांकडे धाव

मुंबई : प्रभादेवीतील कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल या शाळेने सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचे २७ हजार ८०० हे संपूर्ण शुल्क एकरकमी भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येईल, असे पत्र पालकांना पाठवले आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भितीचे वातवरण पसरले आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गतवर्षी कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे अनेक पालकांना शुल्क भरणे शक्य झाले नाही. त्यातच आता पुन्हा केलेल्या लॉकडाऊनमुळे पालकांची आर्थिक परिस्थितीही बिकट झाली आहे. प्रभादेवीतील कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूलने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण शुल्क २७ हजार ८०० एकरकमी भरावे. हे शुल्क न भरल्यास पुढील प्रवेश रद्द करण्यात येतील, असे पत्र पालकांना पाठवले आहे. त्यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

पालकांची युवासेनेच्या सिनेट सदस्यांकडे धाव

दरम्यान, याबाबत पालकांनी युवासेनेचे सिनेट सदस्य यांच्याकडे धाव घेतली. शुल्क एकदम भरण्याच्या शाळांच्या आदेशाची दखल घेऊन युवासेना व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व राज्य मंत्री बच्चू कडू यांच्याकडे लेखी तक्रार करुन पाठपुरावा केला. यामध्ये त्यांनी मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणे यावर्षी २०२१-२२ चे शैक्षणिक शुल्क सर्व शालेय विद्यार्थ्यांना तीन ते चार हप्त्यांमध्ये भरण्याची मुभा उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व शैक्षणिक संस्थांना देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली होती.

या पत्राची दखल घेत शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण निरक्षक देविदास महाजन यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून गर्ल्स कॉन्व्हेन्ट हायस्कूल येथील बीट अधिकाऱ्यांमार्फत नोटीस बजावण्यात येईल तसेच पत्रक काढून या शाळेस विद्यार्थ्यांना हप्त्यामध्ये शुल्क भरण्याची मुभा देण्याचे आदेश देण्यात येतील असे आश्वासन दिले.