कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना खीळ, स्थानक उभारणीची निविदा पुन्हा लांबणीवर

वांद्रे कुर्ला-संकुल येथे भूमिगत स्थानक उभारणीसाठी एक हजार ८०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ४.९ हेक्टर जागेत स्थानक उभारले जाणार आहे. १६ डब्यांच्या बुलेट ट्रेन गाडय़ांसाठी सहा फलाट उभारले जातील. प्रवासी सुविधांसह आकर्षक असे भूमिगत स्थानक असणार आहे.

    मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना राज्यातही खीळ बसली आहे. बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात आधीच भूसंपादनाची प्रक्रिया धीम्या गतीने सुरू असून पालघरमध्ये साधारण १३ टक्के  आणि ठाणे जिल्ह्य़ात ४४ टक्के  असे सरासरी राज्यात २४ टक्क्यांपर्यंतच भूसंपादन झाले आहे. सर्वाधिक भूसंपादन दादरा- नगर हवेलीमध्ये १०० टक्के  आणि गुजरातमध्ये ९४ टक्के  झाले आहे. काहीशा विरोधामुळे भूसंपादनाची सुरुवातीपासूनची प्रक्रि या रखडत होती. त्यातच गेल्या वर्षी एप्रिल २०२० पासून करोना व लागलेल्या टाळेबंदीमुळे ही प्रक्रि या आणखी रखडली व त्याचे काम थांबले.

    तसेच ठाणे, पालघरमधील भूसंपादन प्रक्रिया थांबलेली आहे. तर वांद्रे-कुर्ला संकुलात स्थानक उभारणीसाठी मे महिन्यात काढली जाणारी निविदा पुन्हा लांबणीवर पडली आहे. परंतु टाळेबंदी शिथिल होताच पुन्हा याला गती देण्याचा निर्णय झाला व काम जोमाने सुरूही झाले. मात्र २०२१ मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतच गेला व आता भूसंपादन प्रक्रिया पूर्णपणे थांबल्याचे नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉपरेरेशनकडून सांगण्यात आले.