
मुंबई : कोरोनामुळे आधीच देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे विविध संकटामुळे यंत्रमाग उद्योगात अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. सातत्याने येणाऱ्या संकटांमुळे यंत्रमाग उद्योजक हतबल झाले आहे.
यातून मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. केंद्र आणि राज्य शासनाने या उद्योगाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून मदतीचा हात द्यावा, अशी भावना उद्योजकांत निर्माण होत आहे.
उद्योगातून प्रगती होण्याऐवजी आर्थिक संकटात सापडत चालल्यामुळे दोन वर्षांत २० पेक्षा जादा यंत्रमागधारकांनी आपले जीवन संपवले आहे. या उद्योगाची वेळीच परिस्थिती न सुधारल्यास शेतकऱ्यांप्रमाणे यंत्रमागधारकांचेही आत्महत्येचे सत्र नजीकच्या काळात सुरू होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. यंत्रमाग उद्योजकांनी बँका, पतसंस्था व वित्तीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणात कर्जाची उचल केली आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.
पुढे परिस्थिती सुधारेल, या आशेने उद्योजक नुकसानीत जाऊनही उत्पादन करीत आहेत, पण त्यातून दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याचे चित्र आहे. व्यवसायात असणारी मंदी, यंत्रमागाच्या सुट्या भागाचे वाढते दर, वीज दरात वाढ, कामगार मजुरी, सूत दरवाढीप्रमाणे उत्पादित कापडाला न मिळालेला दर, सुताचा काऊंटमधील घोळ अशा विविध कारणांनी यंत्रमागधारक मेटाकुटीला आला आहे. यामुळे उद्योग नुकसानीत जात असल्याने कर्जाची परतफेड करताना नाकीनऊ येत आहे.