कोरोनामुळे चैत्यभूमीवर उसळणाऱ्या जनसागराला ओहोटी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशाच्या कोनाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने जनसमुदाय लोटतो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर गर्दी करू नका, घरातूनच ऑनलाईन अभिवादन करा असे आवाहन राज्य सरकार व महापालिकेने केले होते. त्यासाठी थेट प्रक्षेपणही करण्यात आले, त्याला प्रतिसाद देत भीम अनुयायांनी ऑनलाईन अभिवादन केले. .

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (DR. B .R Ambedkar) यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना देशभरातून अभिवादन करण्यात आले. दरवर्षी दादरच्या (Dadar) चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसागर उसळतो. मात्र कोरोनाच्या संकटामुळे यंदा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन अभिवादन करण्याच्या प्रशासनाच्या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. थेट प्रक्षेपणामुळे लाखो अनुयायांनी घरबसल्या बाबासाहेबांना अभिवादन केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, महापौर किशोरी पेडणेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी मान्यवरांनी बाबासाहेबांना वंदन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशाच्या कोनाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने जनसमुदाय लोटतो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर गर्दी करू नका, घरातूनच ऑनलाईन अभिवादन करा असे आवाहन राज्य सरकार व महापालिकेने केले होते. त्यासाठी थेट प्रक्षेपणही करण्यात आले, त्याला प्रतिसाद देत भीम अनुयायांनी ऑनलाईन अभिवादन केले. चैत्यभूमीवर सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत संघटना व शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले. राज्यपाल, उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते, महापौर आदी राजकीय नेत्यांनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी लोकराज्य मासिकाचे राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. बाबासाहेबांच्या स्मृती स्थळावर हेलिकॉप्टरमधून पुष्टवृष्टी करण्यात आली, चैत्यभूमीवर शासकीय मानवंदनेचे तसेच विविध कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे महामानवाला घरबसल्या अभिवादन करता आले. कोरोनाच्या संकटामुळे चैत्यभूमीवर गर्दी न करता, घरबसल्या ऑनलाईन अभिवादन करा असे आवाहन राज्य सरकार, महापालिका तसेच आंबेडकरी संघटनांनी केले होते. याला अनुयायांनी चांगला प्रतिसाद दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळावी यासाठी प्रशासकीय यंत्रणेने खबरदारी घेतली होती. चैत्यभूमी परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबई महापालिकेने चैत्यभूमी परिसरात रंगरंगोटी, सजावट आदी विविध सोई, सुविधा उपलब्ध केल्या होत्या. बाबासाहेबांच्या विचारांवर भीमगीते, जलसा, विचारमंथनाचे कार्यक्रम सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत चैत्यभूमीसह चाळी, वसाहतीत आयोजित करण्यात आले. बाबासाहेबांच्या राजगृह निवासस्थान ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. चेंबूर येथील आंबेडकर उद्यान परिसर, वसाहतींतून तसेच समाज माध्यमांवर बाबासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देत अभिवादन करण्यात आले.

बाबासाहेबांना पत्राव्दारे वंदन –

कोरोनाच्या संकटामुळे चैत्यभूमीवर येता आले नाही, मात्र भीमअनुयायांनीवून पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या. दादरच्या पोस्ट ऑफिसमध्ये राज्याच्या कानाकोप-यातून हजारो पत्र(Letter) आली. या पत्राव्दारे महामानवाला वंदन करण्यात आले. विश्वशांती सामाजिक संस्थेच्या प्रयत्नांतून त्यांच्या भावना चैत्यभूमीपर्यंत पोहचवण्यात आल्या. ही पत्र बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अर्पण करण्यात आली.
……..
ग्लोबल पॅगोडा येथे न येण्याच्या आवाहनाला प्रतिसाद –

आर- मध्य विभागातील ग्लोबल पॅगोडा येथे मोठ्या संख्येने अनुयायी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. मात्र कोरोनाच्या संसर्गालामुळे येथील ग्लोबल पॅगोडा बंद ठेवण्यात आला होता. ५ ते ७ डिसेंबरपर्यंत येथे कोणी येऊ नये असे आवाहन महापालिकेने केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत अनुयायांनी घरबसल्या अभिवादन केले.

चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत; जयंत पाटील यांचे बाबासाहेबांना पत्र ,

प्रिय बाबासाहेब,
“देशभरातील कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत. तुम्ही घालून दिलेल्या विचारांचे आजही आम्ही पालन करत आहोत. म्हणून देश हितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित आहे. इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी, उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राचा वारसा असलेल्या पुरोगामी विचारांना तडा न जाऊ देता समता, न्याय, बंधुता या मूल्यांचे आम्ही रक्षण करू. चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील याचा मला विश्वास आहे. महापरिनिर्वाण दिनी तुम्हाला विनम्र अभिवादन!