कोरोनामुळे आर्थिक फटका : व्यापाऱ्यांचे पंधरा लाख कोटींचे नुकसान

मुंबई : कोरोना आणि टाळेबंदी यामुळे देशभरातील लहानमोठ्या व्यापाऱ्यांचे आतापर्यंत पंधरा लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा कॉन्फेड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या व्यापारी संघटनेतर्फे करण्यात आला आहे. 

मार्च अखेरपासून टाळेबंदीमुळे देशातील मॉल, लहानमोठी दुकाने तसेच व्यापार जवळपास बंदच होता. जूनपासून टाळेबंदी काहिशी शिथील झाली असली तरी ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. असे कॅट चे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले.

मागील अनेक वर्षातील बाजारपेठेची सर्वात मोठी दुरवस्था आहे. अद्यापही कोरोनाचे संकट तसेच आहे, उत्पन्न कमी आहे, मात्र वीजबिल, करांच्या रकमा, जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे लागत आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी त्वरेने पावले उचलली नाहीत तर देशातील 20 टक्के दुकाने बंद पडतील व बेरोजगारीत भर पडेल, अशी भीती कॅटने व्यक्त केली आहे.

दरम्यान,  एप्रिल महिन्यातील देशातल्या सर्व व्यापाऱ्यांचा एकत्रित तोटा पाच लाख कोटी होता. मे महिन्यात तो साडेचार लाख कोटी झाला, जून महिन्यात लॉकडाऊन उठवल्यावरही चार लाख कोटींचा तोटा झाला. तर जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात अडीच लाख कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. स्थानिक तसेच बाहेरच्या शहरामधेही ग्राहकानी बाजाराकडे पाठ फिरवली आहे, असेही कॅट ने सांगितले. 

अनेक ठिकाणी दुकानांची वेळ रात्रीपर्यंत असूनही धंदाच नसल्याने बहुतेक दुकानदार संध्याकाळी पाच वाजताच दुकाने बंद करीत आहेत. लॉकडाऊन उठवल्यानंतरही जेमतेम दहा टक्केच ग्राहक दुकानांमध्ये येत असल्याचा अंदाज आहे. केंद्र व राज्य सरकारने अद्यापही व्यापाऱ्यांना कोणतेही आर्थिक पॅकेज दिले नाही. त्यामुळे व्यवसायाचे पुनरुज्जीवन अत्यंत कठीण झाले आहे. सरकारने व्यापाऱ्यांना या कठीण कालावधीत साथ द्यावी, करसवलत, सुलभ कर्जे, जुन्या कर्जांची पुनर्रचना करून द्यावी, अशीही मागणी कॅट ने केली आहे