मंत्रालयात सापडले कोरोनाग्रस्त रूग्ण?

मुंबई: राज्याच्या शासकिय कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

 भाजपा नेत्याच्या क्रिस्टल कंपनीकडे कंत्राट

 
मुंबई: राज्याच्या शासकिय कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे या रूग्णांना मंत्रालयातून पुढील उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
शासकिय कर्मचाऱ्यांचेही कोरोना विषाणूपासून संरक्षण व्हावे या उद्देशाने राज्य सरकारने कर्मचाऱ्यांची संख्या ५ टक्केवर आणली आहे. तसेच गरज असेल त्याच दिवशी कर्मचारी-अधिकारी यांना मंत्रालयात बोलाविले जाते. मात्र मंत्रालयाची स्वच्छता राखण्याचे काम भाजपाच्या एका नेत्याच्या क्रिस्टल या कंपनीला देण्यात आले. या कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून स्वच्छता राखण्याचे काम करण्यात येते. यातील पाच जण कोरोनाबाधीत असल्याचे उघडकीस आल्याने त्यांना उपचारासाठी नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मागील आठड्यातही याच कंपनीचा एक कर्मचारी संशयित असल्याचे आढळून आले होते. विशेष म्हणजे हा भाजपाचा बडा नेता राजकारणातील आपले स्थान बळकट करण्यासाठी कोकणात फिरत आहे. मात्र या महोदयांना आपल्याच कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य राखण्यासाठी पुरेशा गोष्टी उपलब्ध करून द्यायला वेळ नसल्याचे दिसून येत असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आज दुपारी १०८ क्रमांकाची रूग्णवाहीका बोलाविण्यात आली. त्यात या पाच जणांना घेवून जाण्यात आले. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांनाही तपासणीसाठी नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात क्रिस्टलशी संबधित असलेले प्रसाद लाड यांच्याशी फोनवरून सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांचे फोन कॉल्स दुसऱ्या नंबरवर फॉरवर्ड करून ठेवल्याने त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.