कोरोना रुग्णांच्या नखांमध्ये होतोय बदल, तुमच्यामध्येही असं लक्षण असतील तर कसं ओळखायचं ? : वाचा सविस्तर

कोविड-19 ची मुख्य लक्षणं ताप, खोकला, थकवा तसंच चव आणि वास न येणं ही आहेत. तसंच त्वचेवरही या विषाणूची काही लक्षणं दिसली आहेत. मात्र आता नखांवरही कोरोना विषाणूचा प्रभाव पडत असल्याचं दिसून आलं आहे. कोरोना झाल्यानंतर काही रुग्णांच्या नखांचा रंग बदलतो किंवा काही आठवड्यांनी त्याचा आकार बदलतो. याला 'कोविड नेल' म्हटलं जातं. अशी काही प्रकरणं समोर आली आहेत.

  मुंबई : कोविड-19 ची मुख्य लक्षणं ताप, खोकला, थकवा तसंच चव आणि वास न येणं ही आहेत. तसंच त्वचेवरही या विषाणूची काही लक्षणं दिसली आहेत. मात्र आता नखांवरही कोरोना विषाणूचा प्रभाव पडत असल्याचं दिसून आलं आहे. कोरोना झाल्यानंतर काही रुग्णांच्या नखांचा रंग बदलतो किंवा काही आठवड्यांनी त्याचा आकार बदलतो. याला ‘कोविड नेल’ म्हटलं जातं. अशी काही प्रकरणं समोर आली आहेत.

  दरम्यान एका महिला रुग्णाची नखं मुळापासून सैल झाली आणि त्यानंतर तीन महिन्यांनी ती गळून पडली. या आजाराला ‘ओनिकोमाडेसिस’ म्हटलं जातं. यावर काही उपचार नाहीत. नंतर त्या महिलेच्या गळून पडलेल्या नखांच्या जागी आपोआप नवीन नखांची वाढ सुरू झाली होती. त्यामुळे ही समस्या आपोआपच सुटली. दुसऱ्या एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतर 112 दिवसांनी नारंगी रंगाचे चिन्ह आढळले. त्यावर कोणतेच उपचार केले गेले नाही आणि ते चिन्ह एक महिना कायम होते.

  तसेच याबद्दलचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तिसऱ्या प्रकरणात एका रुग्णाच्या नखांवर पांढऱ्या रेषा आढळल्या. या रेषांना ‘मीस लाइन्स किंवा ट्रान्सव्हर्स ल्यूकोनीचिया’ नावाने ओळखलं जातं. या रेषा रुग्णाला कोरोना झाल्यानंतर 45 दिवसांनी आढळल्या तसंच नखं वाढल्यानंतर त्या नाहीशा झाल्या. यावर कोणत्याच उपचाराची गरज नसते.

  काही कोरोना रुग्णांच्या नखांवर लाल रंगाच्या अर्ध चंद्राची आकृती तयार होते आहे. अनेक रुग्णांनी कोरोनाची लागण झाल्याचं कळल्यानंतर दोन आठवड्यापेक्षा कमी कालावधीत हे लक्षणं पाहिलं होतं. अशी लक्षणे असलेले रुग्ण इतरांच्या तुलनेत कमी आहेत. नखांवर अशा प्रकारची अर्ध चंद्राची आकृती दिसणं दुर्मिळ आहे. त्यामुळे हे चिन्ह कोरोना झाल्याचं एक लक्षण असू शकतं. कोरोनामुळे रक्तवाहिन्यांना होणारं नुकसान किंवा विषाणूला प्रतिकार करताना झालेल्या रक्ताच्या गुठळ्या यामुळे नखांवर असे अर्धचंद्र दिसून येऊ शकतात. यामध्ये नखांचा रंगही फीका होऊ शकतो. तुम्हाला इतर कोणतीही लक्षणं नसतील, तर नखांवरील या आकृत्यांबाबत चिंता करण्याची गरज नाही.

  या आकृत्या किती दिवस राहतात, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एका अहवालानुसार, काही रुग्णांना ही लक्षणं एक आठवडा तर काहींमध्ये 4 आठवडे राहिली. काही रुग्णांना त्यांच्या हाताच्या आणि पायांच्या बोटांच्या नखांजवळ वेगवेगळ्या रेषादेखील दिसल्या. कोरोना रुग्णांमध्ये या रेषा लागण झाल्यानंतर सहसा चार आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळानी दिसतात. सामान्यरित्या शारीरिक तणाव, कुपोषण किंवा केमोथेरेपीच्या दुष्परिणामामुळे नखांची वाढ खुंटते. मात्र, हे कोरोनामुळेदेखील होऊ शकतं. शारीरिक तणाव असल्यास या रेषा 4-5 आठवड्यांनी दिसतात. नखं दर महिन्याला 2 मिमी ते 5 मिमी पर्यंत वाढतात. नखं जसजशी वाढतात तसतशा त्या जास्त दिसतात. या रेषांसाठी कोणताही विशिष्ट उपचार नाही.

  नखांवर लक्षणं असलेले मोजकेच रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे हे कोरोनामुळेच झालं किंवा ही कोरोनाची लक्षणं आहे, असं म्हणणं घाईचं ठरेल. या तिन्ही लक्षणांचा कोरोनाशी संबंध नसूदेखील शकतो. त्यामुळे यावर अभ्यास होणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञांचे म्हणणं आहे.