टोलवसुली कामामुळे होऊ शकतो हजार कामगारांना कोरोनाचा धोका

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन दरम्यान २७ मार्चपासून मुंबईच्या सीमेवरील टोल बंद करण्यात आला होता. मात्र, आता सोमवारपासून पुन्हा टोल वसुलीला सुरुवात झाली आहे. यामुळे, शहरातल्या तब्बल १ हजार २०० टोल कामगारांना कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 मुंबई :  कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन दरम्यान २७ मार्चपासून मुंबईच्या सीमेवरील टोल बंद करण्यात आला होता. मात्र, आता सोमवारपासून पुन्हा टोल वसुलीला सुरुवात झाली आहे. यामुळे, शहरातल्या तब्बल १ हजार २०० टोल कामगारांना कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 
चोवीस तास सुरू असणाऱ्या टोल नाक्यावर टोल कर्मचाऱ्यांचा हजारो लोकांशी संबंध येतो. त्यामुळे, ही शंका घेण्यास वाव आहे, असे भविष्य निर्वाह निधीचे क्षेत्रीय सदस्य अशोक पराडकर यांनी बोलताना सांगितले. मुंबईच्या सीमेवरील दहिसर, मुलुंड पूर्व व पश्चिम, ऐरोली, वाशी, कल्याण कोनगांव, कटाई तसेच मुंबईतील वरळी सी लिंक अशा आठ टोल नाक्यांवर १ हजार २०० कामगार टोल वसुलीचे काम करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संबंधित कंपन्यांनी कोणत्याही सुविधा या कामगारांना दिलेल्या नाहीत.
 
अनेक कामगारांनी याबाबत नाराजी व्यक्त करत काम न करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, या टोल कंपन्या कामगारांवर दबाव टाकत असल्याचे पराडकर यांनी सांगितले. एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपर या कंपनीने फेब्रुवारी २०२० पासून आतापर्यंतचा पगारही कामगारांना दिला नाही. त्यामुळे, मुंबईच्या विविध दाटीवाटीच्या भागात राहणाऱ्या कामगारांच्या कुटुंबीयांचे हाल होत आहेत. दरम्यान, रविवारी रात्रीपासून टोल नाके सुरू झाले आहेत. कंपनी कामगारांना कामावर रूजू होण्याची सक्ती करण्यात येत आहे.
 
कोरोनापासून बचाव करण्याची कोणतीही यंत्रणा नाही, तर या कामगारांना विम्याचे कोणतेही संरक्षण नाही. अशात या कामगारांनी आपला बळी द्यावयाचा का ? टोल वसुलीचे काम समजून न घेता टोल वसुलीला परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल पराडकर यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्रही लिहिले आहे. या कामगारांचा कामगार कल्याण निधी भरावा लागू नये, यासाठी या कंपन्यांनी नियमबाह्य कामगारांची गटवारी केली आहे. यातही कामगार मंत्र्यांनी लक्ष घालावे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.