bmc

मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने पालिकेने कठोर नियम राबवण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेने कोरोना नियमांचे उल्लंघन करण्याविरोधात दंड आकारण्यासह गुन्हा दाखल करण्यासारखी कठोर कारवाई करण्यात येत आहे. ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बारमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या पथकाने बुधवारी रात्री तिथे छापा टाकला.

    मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करा असे सातत्याने सूचना देऊनही नियम धाब्यावर बसवणा-यांना पालिकेने चांगलाच चाप लावण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने सध्या व्यक्ती आणि उपहारांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. ब्रिच कॅन्डी रुग्णालयाजवळील अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बारवर बुधवारी रात्री छापा टाकला. त्यात विनामास्क आणि सुरक्षित अंतराचे नियम मोडणाऱ्या कर्मचारी आणि ग्राहक अशा २४५ जणांवर दंडात्मक कारवाई केली. तर रेस्टॉरंट अँड बारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बारचा परवानाही रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

    मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने पालिकेने कठोर नियम राबवण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेने कोरोना नियमांचे उल्लंघन करण्याविरोधात दंड आकारण्यासह गुन्हा दाखल करण्यासारखी कठोर कारवाई करण्यात येत आहे. ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बारमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या पथकाने बुधवारी रात्री तिथे छापा टाकला.

    यावेळी तेथील विनामास्क असलेल्या २४५ लोकांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यांच्याकडून १९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोनाच्या नियमांचे पालन केले नाही म्हणून बारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दिवसभरात या बारचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. दरम्यान, रेस्टॉरंट अँड बारवर कारवाईची ही दुसरी घटना असून या आधी वरळीतील कमला मिलमधील रेस्टॉरंट अँड बारवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    मुंबईत गेले वर्षभर कोरोना असून फेब्रुवारीपर्यंत रुग्णसंख्या कमी आली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे मुंबईकरांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य सरकार आणि पालिकेने टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया राबवली. सर्व सुविधा खुल्या केल्या. यात लोकलसह बेस्ट, रिक्षा, टॅक्सी यासारखी वाहतुकीची सर्व साधने खुली करण्यात आली. मात्र, काही बेजबाबदार व्यक्ती अत्यावश्यक कारणांशिवाय सार्वजनिक ठिकाणी विनामास्क तसेच कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून फिरत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. वाढती गर्दी आणि विनामास्क फिरल्याने पुन्हा कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे नियम मोडणा-यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकड़ून सांगण्यात आले.

    मुंबईत गेल्या १५ दिवसात दीड हजार ते तब्बल २३०० रुग्ण दिवसाला सापडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी गर्दी करू नये, सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन वेळोवेळी केले जात आहे. तसेच बार, हॉटेल, पब, रेस्टोरंट, लग्न समारंभ आदी गर्दीच्या ठिकाणी पालिकेने छापा टाकून कारवाई सुरू केली आहे. सार्वजनिक ठिकाणांबरोबरच बार, उपहारगृहे येथे नियम मोडणाऱ्या बेजबाबदार व्यक्तींवर शिवाय उपहारगृहातील उपस्थित असलेल्या ग्राहकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.