corona in dharavi

मुंबईत कोरोना हॉटस्पॉट(corona hotspot) ठरलेल्या धारावीसह(dharavi) माहिम(mahim), दादरमधील (dadar)कोरोना(corona) आटोक्यात आला आहे.

मुंबई: मुंबईत कोरोना हॉटस्पॉट(corona hotspot) ठरलेल्या धारावीसह(dharavi) माहिम(mahim), दादरमधील (dadar)कोरोना(corona) आटोक्यात आला आहे. या तिन्ही विभागात मंगळवारी कोरोना रुग्णांची संख्या ११ वर आली असल्याने या विभागातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

धारावीसारख्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर मुंबईकरांची चिंता वाढली होती. विस्तीर्ण असलेल्या या झोपडपट्टीत कोरोना पसरल्यास त्यावर नियंत्रण कसे मिळवणार,असा प्रश्न यंत्रणांसमोर उभा राहिला होता. मात्र पालिकेने पहिल्या दिवसापासून यंत्रणा कामाला लावली. विविध उपाययोजना, उपचार पद्धती, कंटेन्मेंट झोनमधील कठोर अंमलबजावणी, घरोघरी सर्वेक्षण आदी प्रभावी उपाययोजना राबवल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यात पालिकेला यश आले.

पालिकेच्या या कामाची जगभरात नोंद घेण्यात आली. धारावीत रुग्णसंख्या कमी झाली, मात्र दादर व माहिमधील रुग्णांची संख्या कमी- जास्त राहिली. मात्र गेल्या काही दिवसांपासून माहिम व दादरमधील रुग्ण संख्याही नियंत्रणात येत आली आहे. या तिन्ही विभागात मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्या विशीच्या आत आल्याचे समाधानकारक चित्र राहिले आहे.

धारावी, माहिम आणि दादर विभागात मंगळवारी एकूण ११ रुग्ण आढळून आले. यामध्ये धारावीत ४, दादरमध्ये ५ आणि माहिममध्ये २ अशी रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत या तिन्ही विभागांमध्ये एकूण १२ हजार ९३७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ११ हजार ९२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या ३८५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आतापर्यंत ६२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आठ दिवसातील तिन्ही विभागातील रुग्णसंख्या
७ डिसेंबर – १३
 ८ डिसेंबर – १६
 ९ डिसेंबर – २१
१० डिसेंबर – १९
११ डिसेंबर – १७
१२ डिसेंबर – १५
१३ डिसेंबर – २०
१४ डिसेंबर – ०६
१५ डिसेंबर – ११