कोरोनाने चांगलांच धडा शिकवला; वैद्यकीय यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेतला मोठा निर्णय

गेल्या दीड वर्षापासून देशासह राज्यात कोविड विषाणूचा प्रार्दूभाव वाढल्याने राज्यातील वैद्यकीय यंत्रणेवर ताण आल्याचे दिसून आले आहे. मात्र, येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्हयात शासकीय महाविद्यालय उभारणीबाबतचा दृष्टीकोन ठेवून त्यादृष्टीने काम करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख(Medical Education Minister Amit Deshmukh ) यांनी सांगितले.

  मुंबई : गेल्या दीड वर्षापासून देशासह राज्यात कोविड विषाणूचा प्रार्दूभाव वाढल्याने राज्यातील वैद्यकीय यंत्रणेवर ताण आल्याचे दिसून आले आहे. मात्र, येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्हयात शासकीय महाविद्यालय उभारणीबाबतचा दृष्टीकोन ठेवून त्यादृष्टीने काम करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख(Medical Education Minister Amit Deshmukh ) यांनी सांगितले.

  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा येत्या 5 वर्षातील दृष्टीकोन (प्रॉस्पेटिव्ह प्लॅन) कसा असेल यासंदर्भातील आढावा बैठक आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त विरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अवर सचिव डॉ. पु. कोतवाल यांच्यासह महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

  आज राज्यात प्रत्येक जिल्हयात शासकीय वैद्यकीय रुग्णालयाची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. त्यामुळे या रुग्णालय उभारणीसाठी आवश्यक असणारा निधी, कुशल मनुष्यबळ तसेच रुग्णालयाची उभारणी कशी करता येईल याबाबत नियोजन होणे आवश्यक आहे. केरळ, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक येथील राज्यात कुशल परिचारिका असतात आणि याची मागणी देशभरात असते. या परिचारिकांना काय वेगळे प्रशिक्षण दिले जाते, त्यांचा अभ्यासक्रम काय असतो, त्या राज्यांची परिचारिका महाविद्यालय सुरु करण्याबाबतचे धोरण नेमके काय आहे याचा सुध्दा अभ्यास होणे आवश्यक असल्याचे देशमुख म्हणाले.

  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे देशातले महत्वाचे विद्यापीठ असून काहीतरी काळाच्या पुढे जाऊन विद्यार्थी हीत पाहून नियोजन करणे आवश्यक आहे. पुढील पाच वर्षांचा विचार करीत असताना बदलत्या परिस्थितीनुसार आणि विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार अभ्यासक्रमांची आखणी करणे आवश्यक आहे. पॅरामेडिकल अभ्यासक्रम, हॉस्पीटल मॅनेजमेंट, वेगवेगळया अभ्यासक्रमांतील रिसर्च, आयुष इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु करण्यावरही विद्यापीठइाने भर द्यावा असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

  गेल्या दीड वर्षांपासून रुग्णालयांमध्ये परिचारिका, तंत्रज्ञ, लॅब टेक्निशिअन यांची नितांत आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येणाऱ्या 5 वर्षांच्या प्रॉस्पपेटिव्ह प्लॅनमध्ये परिचारिकांसाठी अभ्यासक्रम तसेच वैद्यकीय क्षेत्रांसाठी आवश्यक असणाऱ्या पूरक अभ्यासक्रमांची आखणी करणे आवश्यक आहे.

  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत राज्यातील वैद्यकीय संस्थांना संस्था सुरु करण्यास मान्यता देण्यात येतात. मान्यता देत असतानाचे निकष संस्था पूर्णपणे पाळत आहे का, संस्थेचे ॲकॅडमिक, इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिझल्ट बेस्ड ऑडिट सुध्दा होणे आवश्यक आहे. मान्यता देण्यात आलेल्या संस्था नियमांनुसार काम करतात का हे सुध्दा पाहिले जाणे आवश्यक आहे. संस्थांना मान्यता देत असतानाचे निकष नेमके कसे ठरविले जातात, संस्थांना देण्यात येणाऱ्या नुतनीकरणासंदर्भात सुलभता याबाबतही निश्चित धोरण आवश्यक असल्याचे देशमुख यावेळी म्हणाले.