राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांना आता कोरोना चाचणी बंधनकारक नसणार ; महापालिकेची सुधारीत नियमावली

मुंबई विमानतळावर उतरलेल्या राज्यांतर्गत, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांची कोरोना चाचणी पालिकेच्या पथकाकडून नियमित केली जाते. मात्र, आता यातून राज्यातंर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सूट देण्यात आली आहे. मात्र, ती व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक असणार आहे.

    मुंबई – राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील कोणत्याही विमान प्रवाशाला आता यापुढे प्रवासादरम्यान आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक नसेल. मात्र, ती व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे. असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.

    मुंबई विमानतळावर उतरलेल्या राज्यांतर्गत, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांची कोरोना चाचणी पालिकेच्या पथकाकडून नियमित केली जाते. मात्र, आता यातून राज्यातंर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सूट देण्यात आली आहे. मात्र, ती व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक असणार आहे.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवर महापालिकेचे विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाकडून प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते. यावेळी महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या इतर भागांत प्रवास करणाऱ्यांनाही आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आल्याने प्रवाशांना प्रवासादरम्यान अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

    त्यामुळे यापुढे राज्यांतर्गत प्रवाशांना विमानतळांवर आरटी-पीसीआर चाचणी करणे किंवा आधी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक नसेल अशी सुधारित नियमावली पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी जारी केली आहे.

    आतापर्यंत १ हजार ८७५ वर विद्यार्थ्यांचे लसीकरण

    उच्च शिक्षणासाठी मुंबईतून परदेशात जाणा-या १ हजार ८७५ विद्यार्थ्यांना आतापर्यंत लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. सोमवारपासून पालिकेच्या कस्तुरबा, कूपर आणि राजावाडी रुग्णालयांत विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. दररोज या तिन्ही रुग्णालयात ३०० डोस उपलब्ध करण्यात आले असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.