Corona Upadates : आता ५०० रुपयांत होणार ‘RTPCR’ कोरोना चाचणी; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा करुन ४५०० रुपयांवरुन आता नव्या सुधारित दरानुसार केवळ ५०० रुपयांत ही चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

    मुंबई: राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा कमी करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली, तर रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर १५० रुपये करण्यात येणार आहेत असा आरोग्य विभागाने निर्णय देखील जाहीर केला आहे.

    कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा करुन ४५०० रुपयांवरुन आता नव्या सुधारित दरानुसार केवळ ५०० रुपयांत ही चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. यापूर्वी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये अनुक्रमे १२००, ९८० आणि ७०० रुपये असे दर करण्यात आले होते. आजच्या निर्णयानुसार आता कोरोना चाचण्यांसाठी ५००, ६०० आणि ८०० असे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरुन नमूना घेवून त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून ५०० रुपये आकारले जातील.

    रुग्णालय, कोविड केअर सेंटर, कॉरंटाईन सेंटर मधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी ६०० रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेवून त्याचा अहवाल देणे यासाठी ८०० रुपये आकारण्यात येणार आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी नमूद केले आहे.

    आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमूने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जावून नमूने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी २५०, ३०० आणि ४०० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी ३५०, ४५०, ५५० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास १५०, २०० आणि ३०० असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.