१ नं. काम! चार दिवसात १३७ कोटी ६१ लाख थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा : राज्य सरकारची सढळ हाताने मदत

हसन मुश्रीफ यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत सक्रीय १३ लाख बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट (डीबीटी) जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार राज्यातील १३ लाखांपैकी ९ लाख १७ हजार नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे.

    मुंबई : राज्यात जमाबवंदी आदेश लागू करून कडक निर्बंधांची अंमलबजावणी करतानाच मदत म्हणून राज्य सरकारने बांधकाम मजुरांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली आहे. गेल्या चार दिवसात १३७ कोटी ६१ लाखांचा निधी थेट मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

    दीड हजार रुपयाचे अर्थसहाय्य

    हसन मुश्रीफ यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत सक्रीय १३ लाख बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट (डीबीटी) जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार राज्यातील १३ लाखांपैकी ९ लाख १७ हजार नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे. अवघ्या चार दिवसात १३७ कोटी ६१ लाखांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात झाला जमा करण्यात आल्याने कष्टकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. राज्यात १ मे २०२१ पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे इमारत व इतर बांधकामे तसेच इतर कामगार वर्गाची कामे पूर्ववत सुरू झालेली नसल्याने कामगांराना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन नोंदित कामगारांना दीड हजार रुपयाचा अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू होत असून याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

    आरोग्य तपासणी आणि शिवभोजन

    गेल्या वर्षीही कोविड -१९ या विषाणूच्या प्रादूर्भाव कालावधीत नोंदीत बांधकाम कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली होती. त्याशिवाय या नोंदणीकृत बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्याची मंडळाकडून योजना राबविण्यात येत असून आतापर्यंत २लाख ३ हजार कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सर्वच नोंदीत कामगारांची युद्धपातळीवर आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. कोविड१९ विषाणू प्रादुर्भाव कालावधीत पार्श्वभूमीवर मुंबई / नवी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर येथे बांधकाम कामगारांना मध्यान्ह व रात्रीचे भोजन वितरित करण्यात येत आहे. त्यामुळे परप्रांतीय बांधकाम कामगारांनी स्थलांतर करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.