खासगी रुग्णालयातही लसीकरण होणार 24×7, रोज १ लाख लोकांना डोस देण्याचे लक्ष्य

लसीकरण वाढविण्याबाबत(corona vaccination available for 24 hours) मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल(iqbal singh chahal) यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आज बुधवारी विशेष आढावा व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनीही मार्गदर्शन केले.

    मुंबई: केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मुंबईत कोरोना लसीकरण(corona vaccination in mumbai) मोहिम सुरू आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आता खासगी रुग्णालयातील लसीकरण(vaccination in private hospitals) केंद्रे २४ तास सुरु ठेवण्याची मुभा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे दररोज एक लाख व्यक्तींच्या लसीकरणाचे लक्ष्य प्रशासनाने असणार आहे.

    लसीकरण वाढविण्याबाबत महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आज बुधवारी विशेष आढावा व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनीही मार्गदर्शन केले. तर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचे ज्येष्ठ अधिकारी, मनपा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर मंडळी, महापालिका क्षेत्रातील विविध खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. लसीकरण वाढवण्याबाबत त्यासंदर्भातील मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.

    सध्या ६० वर्ष पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ९ मार्च २०२१ पर्यंत १ लाख ३६ हजार ४९१ व्यक्तिंचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच वय-वर्षे ४५ ते ५९ या वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तिंचेही लसीकरण करण्यात येत असून, या गटातील १५ हजार २७२ व्यक्तिंचे लसीकरण दिनांक ०९ मार्च, २०२१ पर्यंत करण्यात आले आहे. दोन्ही वयोगटातील व्यक्तिंचे लसीकरण करण्यासाठी १ जानेवारी, २०२२ रोजीचे वय लक्षात घ्यावयाचे आहे. यानुसार बुधवारी ज्यांचे वय ५९ वर्षे ३ महिने किंवा सहव्याधी असणाऱ्या गटातील व्यक्तिचे वय ४४ वर्षे ३ महिने असले, तरी देखील त्यांची लसीकरणासाठी नोंदणी करणे व नंतर लसीकरण करणे शक्य आहे, ही बाब आयुक्तांनी बैठकी दरम्यान आवर्जून नमूद केली.

    मुंबईमधील खासगी रुग्णालयांना आठवड्याचे सातही दिवस व दिवसाचे २४ तास लसीकरण सुरु ठेवण्याच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावास केंद्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यानुसार केंद्र शासनाच्या संबंधित संकेतस्थळावर आवश्यक ते बदल करण्याची विनंती महापालिकेने केंद्र शासनाकडे केली आहे. केंद्र शासनाने दिलेल्या मंजुरीनुसार मुंबईतील रुग्णालयांनी आठवड्याचे सातही दिवस २४ तास सुरु राहणारी लसीकरण केंद्रे सुरु करावीत, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.