मुंबईत कोरोना लसीचा तुटवडा; २६ लसीकरण केंद्र बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. मुंबईत ११८ लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत एकूण एकूण १५ लाख २३ हजार ८१८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. मात्र लसीचा पुरेसा साठा नसल्याने २६ लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद करण्यात आले आहे.

    मुंबई : मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबईतील विविध ठिकाणची २६ केंद्रे लसी अभावी बंद करावी लागली आहेत. लस उपलब्ध न झाल्यास येत्या दोन दिवसांत आणखी काही लसीकरण केंद्रे बंद होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

    कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. मुंबईत ११८ लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत एकूण एकूण १५ लाख २३ हजार ८१८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. मात्र लसीचा पुरेसा साठा नसल्याने २६ लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद करण्यात आले आहे.

    मुंबईत एकूण ११८ ठिकाणी लसीकरण केले जाते. त्यापैकी मुंबई महापालिकेच्या ३३ राज्य आणि केंद्र सरकारच्या १४ तसेच खासगी रुग्णालयात ७१ केंद्रांवर लसीकरण केले जाते. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत सुरु असलेल्या खासगी रुग्णालयातील ७१ केंद्रांपैकी २६ केंद्र बंद करण्यात आली आहेत. लसीचा साठा कमी असल्याने राज्य सरकार, केंद्र सरकार आणि मुंबई महापालिकेची आणखी काही केंद्रे येत्या दोन दिवसांत बंद केली जाणार आहेत. कोव्हॅक्सीनचे जे काही डोस शिल्लक राहिले आहेत ते फक्त दुसरा डोस देण्यासाठी वापरण्यात यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईला पुढील लसीचा साठा १५ एप्रिलला मिळणार असल्याने तो पर्यंत लसीकरण बंद ठेवावे लागणार आहे.

    मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना रोखण्यासाठी पालिकेने लसीकरणावर भर दिला आहे. पालिकेने लसीची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. राज्याने केंद्र सरकारकडे लसीचा पुरवठा करण्यासाठी पत्र दिले आहे. लस मिळावी यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत असल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगीतले.

    दोन दिवसांपूर्वी मुंबईत कोव्हीशील्डचे १ लाख ८५ हजार तर कोवॅक्सीनचे ८ हजार ८४० इतकेच डोस बाकी होते. आता हा साठा कमी झाला आहे. मुंबईत मंगळवारी ५० हजार ५९४ तर बुधवारी ६१ हजार ८९६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. यामुळे लसीचा साठा कमी झाला आहे.