corona vaccine

कोरोना लसीची(corona vaccine) चाचणी अंतिम टप्प्यात आली असून कोरोनाची लस मुंबईच्या उंबरठ्यावर(corona vaccine in Mumbai) येऊन ठेपली आहे. मुंबई पालिकेच्या पहिल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लसीसंदर्भातील तयारीवर चर्चा झाली. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १.२५ लाख सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस देण्यात येणार आहे.

मुंबई : कोरोना लसीची(corona vaccine) चाचणी अंतिम टप्प्यात आली असून कोरोनाची लस मुंबईच्या उंबरठ्यावर(corona vaccine in Mumbai) येऊन ठेपली आहे. मुंबई पालिकेच्या पहिल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लसीसंदर्भातील तयारीवर चर्चा झाली. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १.२५ लाख सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या लसीचे दोन डोस देण्यात येणार आहेत.

सुरूवातीला आठ ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. लसीकरण कडक सुरक्षाव्यवस्थेंतर्गत केले जाणार असून लसीकरण केल्यानंतर संबंधित व्यक्तीला ३० मिनिटांपर्यंत तेथेच थांबावे लागेल, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

कोविड लसीकरणासाठी शुक्रवारी राज्य सरकार आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांची टास्क फोर्ससोबत पहिली बैठक पार पडली. या बैठकीत लसीकरणाची विस्तृत योजना सादर करण्यात आली. कांजूरमार्गसह दोन ठिकाणी लसीसाठी स्टोरेज केंद्र सुरू करण्यात येणार आहे. शिवाय मुंबईतील चार प्रमुख रूग्णालये आणि उपनगरांतील चार रूग्णालयांमध्ये वॅक्सीन देण्यात येणार आहे. दिल्लीहून आलेल्या टास्क फोर्सच्या टीमने पालिकेच्या तयारीचा आढावा घेतला. राज्य सरकार टास्क फोर्स आणि दिल्लीच्या टीमने पालिकेला काही सूचना केल्या.

बैठकीच्या प्रारंभी कृती दलाचे अध्यक्ष काकाणी यांनी बैठकीचा उद्देश समजावून सांगितला. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कोविड – १९ ची लस उपलब्ध झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी योग्य तयारीसह आणि पूर्व नियोजनाने करणे आवश्यक आहे. सिटी टास्क फोर्सप्रमाणे क्षेत्रीय स्तरावरील (विभाग कार्यालय स्तर) समिती गठीत करण्याची कार्यवाही देखील लवकर पूर्ण करावयाची आहे.

मोहिमेतील सहभागी मनुष्यबळास आवश्यक ते प्रशिक्षण देण्यासाठी मुख्य प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्यक्ष लसीकरण करण्यासाठी पाच जणांचे एक याप्रमाणे मुंबईत सुमारे ५०० पथके नेमली जातील. लसीकरणाच्या लाभार्थ्यास नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर संदेश प्राप्त होईल. या सर्व कार्यवाहीसाठी व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात आली आहे. सर्वात आधी आरोग्य सेवक, त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स, नंतर वय वर्ष ५० पेक्षा अधिक आणि इतर/सहव्याधी असलेले नागरिक या क्रमाने लसीकरण करण्याचे नियोजित आहे. सर्व यंत्रणांनी प्रत्येक टप्प्यावर नेमून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी सिटी टास्क फोर्सच्या माध्यमातून संपूर्ण देखरेख केली जाईल, असे ते म्हणाले.

सहाय्यक आरोग्य अधिकारी (लसीकरण) डॉ. शीला जगताप यांनी सिटी टास्क फोर्स आणि कोविड – १९ लसीकरण अंमलबजावणीबाबत सादरीकरण करुन तपशीलवार माहिती दिली. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एस विभागात कांजूरमार्ग येथील एका इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर कोविड – १९ प्रतिबंधात्मक लस साठवणुकीची पूर्व तयारी करण्यात आली आहे. सुमारे ५ हजार चौरस फूट क्षेत्राची ही जागा प्रादेशिक लस भांडार (Regional Vaccine Store) म्हणून निर्देशित करण्यात आली आहे. शासन तसेच जागतिक आरोग्य संघटना यांनी लस वाहतूक, साठवणूक, लसीकरण केंद्रातील व्यवस्था, लसीकरणाचे प्राधान्य इत्यादी सर्व बाबींचे निर्देश ठरवून दिले आहेत. या सर्व बाबींचे काटेकोर पालन होईल, याची दक्षता सर्वांनी घेणे आवश्यक आहे.

लसीकरण कार्यक्रमात सर्व सांख्यिकी माहिती संकलित करुन त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म देखील शासनाकडून तयार करण्यात आला आहे. पूर्व तयारी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी या दोन्ही टप्प्यांमध्ये महानगरपालिकेसह सर्व सहभागी यंत्रणांना जबाबदारी नेमून देण्यात आली आहे. टास्क फोर्सची नियमित बैठक घेऊन सर्व कामकाजाचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती सादरीकरणासह त्यांनी दिली.

उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) देवीदास क्षीरसागर म्हणाले की, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून यापूर्वी विविध लसीकरण मोहीम राबविण्यात आल्या आहेत. त्याचा अनुभव गाठीशी असल्याने कोविड – १९ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्याचा प्रशासनाला आत्मविश्वास आहे. प्रारंभी प्रत्यक्ष लसीकरण केंद्राचे एक मॉडेल उभारुन, त्याचा अभ्यास करुन त्याआधारे पुढील लसीकरण केंद्र उभारता येईल. तसेच मनुष्यबळासह आवश्यक ती यंत्रणा, सामुग्री उपलब्ध करुन समर्पितपणे ही मोहीम राबवू, असे क्षीरसागर यांनी नमूद केले.