मुंबईतील कोरोना बळींच्या आकडेवारीत लपवाछपवी; देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईत पुणे, नागपूरच्या तुलनेत कोरतोना चाचण्यांचे प्रमाण कमी असल्याचा आरोप केला आहे. या पत्रात फडणवीस यांनी कोरोना बळीच्या आकडेवारीसह माहिती देत लपवाछपवी केली जात असल्याचा आरोप केला आहे.

  मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईत पुणे, नागपूरच्या तुलनेत कोरतोना चाचण्यांचे प्रमाण कमी असल्याचा आरोप केला आहे. या पत्रात फडणवीस यांनी कोरोना बळीच्या आकडेवारीसह माहिती देत लपवाछपवी केली जात असल्याचा आरोप केला आहे.

  अभासी चित्र निर्माण करणे परवडणार नाही

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रात लिहिले आहे की, कोरोनाचे भय वाढणार नाही याची काळजी घेतानाच अभासी चित्र निर्माण करणे परवडणार नाही. त्यांनी म्हटले आहे की, आपल्याला जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ द्यायचे नाही. कोरोना कमी व्हावा, ही आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, संसर्गदर १५ टक्क्यांच्या पुढे असताना कोरोना कमी होतोय, असे आभासी चित्र तयार करणे योग्य होणार नाही. कोरोना लाटेची सायकल आपण राज्यात, देशात आणि जगात अनुभवली आहे. या सायकलदरम्यान आरोग्य सेवा आणि रुग्ण व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

  ८ दिवसांत कमी चाचण्यांची आकडेवारी

  त्यांनी म्हटले आहे की, शिखरावर गेल्यावर पुन्हा रुग्णसंख्या मॉडरेट होते आणि कमी झाल्यावर श्रेयाचे दावेही जनतेने बघितले आहेत. परंतु महत्त्वाचे हे की, हा शिखरावरचा वेळ कमीत कमी कसा करता येईल आणि त्यादरम्यान आपत्ती कशी कमी करता येईल, हे अधिक महत्त्वाचे आहे,  पत्रात फडणवीस यांनी मुंबईची गेल्या ८ दिवसांतील कमी चाचण्या झाल्याची आकडेवारीच दिली आहे. त्या तुलनेत नागपूर जिल्ह्यात  आणि पुण्यात लोकसंख्येच्या प्रमाणात होणा-या चाचण्याच्या तीन ते चारपट लोकसंख्या असलेल्या मुंबईत केवळ ४० हजार प्रतिदिन चाचण्यांनी शहराचे नेमके चित्र लक्षात येणार नाही आणि त्यातून कोरोना स्थिती हाताळणे भविष्यकाळात पुन्हा कठीण होऊन बसेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

  चाचण्याची संख्या वाढवा

  त्यांनी पत्रात म्हटले आहे की, आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्यांच्या प्रमाणाचा विचार केला तर राज्यात जवळजवळ ४० टक्के चाचण्या या अँटीजेन पद्धतीने होत आहेत. २६ एप्रिल रोजी नोंदलेल्या मुंबईतील २८ हजार चाचण्यांमधील ४० टक्के अँटीजेन चाचण्या गृहित धरल्या तर केवळ सोळा हजार आठशे आरटी-पीसीआर चाचण्या मुंबईत होत आहेत. इतक्या कमी संख्येत जर आरटीपीसीआर चाचण्या होत असतील, तर मुंबईचे नेमके चित्र डोळ्यापुढे येऊच शकणार नाही. कमी आरटीपीसीआर चाचण्या हे अजिबात परवडणारे नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

  कोरोना बळींच्या आकड्यांचा घोळ

  फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे की, मुंबईतून संक्रमित लोक गावी गेले आहेत. गेल्या लाटेत त्यांचे ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग जसे झाले होते, तसे आता होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण वाढते आहे. मुंबईची मृत्यूसंख्या सुद्धा सातत्याने दडविण्याचे काम होते आहे. रिकन्सिलिएशनचे काम अजून पूर्णत्त्वास गेलेले नाही. त्यामुळे जुनी मृत्यूसंख्या नंतर टप्प्या-टप्प्याने अधिक करून नेमके चित्र उभे राहणार नाही. मुंबईच्या घाटांवर रोज अंत्यसंस्कार होणारे मृतदेह आणि रोजची दिली जात असलेली मृत्यूसंख्या याचा कुठेही ताळमेळ नाही. हीच परिस्थिती राज्यांतील अन्य जिल्ह्यांत सुद्धा आहे. गेल्या काही दिवसांत जुने मृत्यू नोंदविण्याच्या प्रक्रियेमुळे राज्यात अवघ्या ७ दिवसांत ४४६० मृत्यू नोंदण्यात आले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबळींच्या संख्येत एकट्या मुंबईत २० टक्के मृत्यू आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या कोणत्याच भागाकडे दुर्लक्ष परवडणारे नाही असे त्यांनी म्हटले आहे.