उन्हाळ्यात कोरोना वाढणार नाही ; स्वयंशिस्त पाळा तरच साथ नियंत्रणात : टोपे

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचं संकट अधिक गहिरे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. देशात कोरोना रुग्ण सापडलेल्या घटनेला मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पण आता पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून कठोर आणि मोठे निर्णय घेण्यात येत आहेत.

    मुंबई: राज्यात कोरोनाचा उद्रेक आटोक्यात येत असल्याचे दिसत असतानाच, कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मात्र, कोरोना साथ वाढण्याचा वातावरणाशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे उन्हाळ्यात कोरोना वाढणार नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले. कोरोनाची साथ पुन्हा नियंत्रणात आणायची असेल तर त्यावर स्वयंशिस्त हा एकच उपाय आहे, असेही टोपे म्हणाले. यावेळी त्यांनी नागरिकांना कोरोनासंबर्धीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेले मी जबाबदार या सूत्राचे पालन केले पाहिजे. ते पाळण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर बंधनकारक आहे, असे टोपे यांनी सांगितले. टोपे यांनी दिलेल्या माहितीनंतर राज्यातील नागरिकांना काहीप्रमाणात दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.

    जिल्हा प्रशासनाचे कठोर निर्णय
    राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचं संकट अधिक गहिरे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. देशात कोरोना रुग्ण सापडलेल्या घटनेला मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पण आता पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून कठोर आणि मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. पुण्यात मंगळवारी कोरोनाचे १०८६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात ७९६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या २४ तासांत ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील ५ जण हे पुण्याबाहेरील आहे. सध्या पुण्यात ३२१गंभीर स्वरुपाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नाशिकमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार आणि रविवारी बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    आरोग्य खात्याच्या परीक्षा नव्याने नाही

    सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने २८ फेब्रुवारी रोजी आयोजित महाभरती परीक्षेला झालेल्या गोंधळामुळे या परीक्षा रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. पण गैरप्रकाराच्या तक्रारी काही निवडक संवर्गांच्या तसेच तुरळक केंद्रांवरील असल्यामुळे संपूर्ण परीक्षाच रद्द होणार नसल्याचे स्पष्टीकरण सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत दिले. कॉपीच्या तक्रारी आलेल्या आरोग्यसेवक आणि चालक या दोन संवर्गाचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. औरंगाबाद येथील सायबर कॅफेचा कॉपीप्रकरणी तपास सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. ४ लाख १६हजार विद्यार्थ्यांनी महापोर्टलद्वारे झालेल्या या परीक्षांसाठी अर्ज केले होते. त्यापैकी १ लाख ३३ हजार परीक्षार्थींनी प्रत्यक्ष परीक्षा दिली आणि ही परीक्षा ३२९ जिल्ह्यातील ८२९केंद्रांवर झाली होती, पण तुरळक केंद्रांवरील तक्रारी आल्याचे ते म्हणाले.

    विरोधकांचे आरोप फेटाळले

    आरोग्य खात्याच्या परीक्षेत इलेक्ट्रिक लॉकमधील प्रश्नपत्रिका, जीपीएसद्वारे त्याच्या वाहतुकीचे ट्रॅकिंग आदी काळजी घेतल्याने गैरप्रकारांना आळा बसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हे काम ब्लॅक लिस्टेड कंपनीस दिल्याचा विरोधकांचा आरोप खोडून काढत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने या कंपनीची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्यमंत्र्यांचा हा खुलासा मंजूर न झाल्याने विरोधी पक्षाने या प्रश्नावर सभागृहात कामकाजावर बहिष्कार घालत सभात्याग केला. इअरफोन घातलेल्या परीक्षार्थीला औरंगाबादच्या एका केंद्रावर पकडले होते. कोकणपुऱ्यातील सायबर कॅफेवर छापा घातला असता आरोग्यसेवक आणि ड्रायव्हर या संवर्गाच्या परीक्षांचे काही प्रश्न तेथे पोहोचल्याची माहिती मिळाली. सायबर गुन्हे शाखेतर्फे याचा तपास सुरू असल्याने वरील दोन्ही संवर्गांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील सुतार संवर्गासाठी एका सेंटरवर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नसल्याने तेथे पुन्हा परीक्षा होतील.