प्रीतम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं; धनंजय मुंडेंची बहिणीसाठी भावनिक प्रार्थना

  मुंबई : “प्रीतम मुंडे यांना काही लक्षणे आढळल्यामुळे त्या उपचार घेत असल्याचे समजले. प्रभू वैद्यनाथ कृपेने लवकरच बऱ्या व्हाल. ही खात्री आणि सदिच्छा व्यक्त करतो,” अशी भावनिक प्रार्थना समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना कोरोनासदृश लक्षणं दिसू लागली आहेत. बीड जिह्यात दौरा करुन मुंबईला परतल्यानंतर त्यांना सर्दी, खोकला आणि ताप जाणवतोय. हे कळताच प्रीतम मुंडे यांचे भाऊ समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे यांनी वरील प्रार्थना केली. त्यांनी ट्विटद्वारे प्रीतम मुंडे यांना काळजी घेण्याचेसुद्धा आवाहन केले.

  धनंजय मुंडे यांनी काय ट्विट केलं ?

  प्रीतम मुंडे यांना कोरोनासदृश लक्षणं जाणवत आहेत. त्यामुळे सध्या त्या क्वॉरन्टाईन आहेत. ही गोष्ट समजताच धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली त्यांनी एक भावनिक ट्विट केलंय. “बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांना काही लक्षणे आढळल्यामुळे त्या उपचार घेत असल्याचे समजले. ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार व काळजी घ्या. प्रभू वैद्यनाथ कृपेने लवकरच बऱ्या व्हाल, ही खात्री व सदिच्छा व्यक्त करतो,” असे धनंजय मुंडे यांनी आल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

  प्रीतम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं ?

  भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागली आहेत. त्यांनी नुकताच बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा केला होता. त्यानंतर मुंबईला परतल्यावर त्यांना त्रास जाणवायला लागला. त्यांनी आपली RTPCR कोरोना चाचणी केली. मात्र, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय. असं असलं तरी त्या घरीच विलगीकरणात थांबल्या आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणखी काही टेस्ट करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधला

  प्रीतम मुंडे म्हणाल्या, “मागील आठवड्यात 14 ते 18 एप्रिल या काळात संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन मी प्रत्येक कोविड सेंटरला भेट दिली. तेथे रुग्णांची आणि डॉक्टरांची विचारपूस केली. प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या. त्यांना योग्य ती कारवाई करायला भाग पाडलं. या माध्यमातून मी आपलं कर्तव्यच पार पाडतेय. हे काम करुन मी पुन्हा 18 एप्रिलला मुंबईला आले. त्यानंतर 2-3 दिवसांनी मला कोरडा खोकला, सर्दी, ताप आणि प्रचंड अशक्तपणा अशी लक्षणं जाणवायला लागली. मी 21 एप्रिल रोजी RTPCR चाचणी केली. त्यात कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलाय.”

  प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध

  दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यामधील कोरोनास्थितीवरुन धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या चांगलीच शाब्दिक लढाई रंगली होती. बीडमधील कोरोना परिस्थिती हाताळण्यात आणि जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणण्यात धनंजय मुंडे अपयश ठरल्याची टीका करत प्रीतम मुंडे यांनी करत धनंजय मुंडे यांना आत्मपरिक्षणाचा सल्ला दिला होता. तर धनंजय मुंडे यांनी खासदार प्रीतम मुंडेंवर पलटवार करत त्यांना अचानक जिल्हयात आल्यानं उशिरा शहाणपण आल्याचा टोला लगावला होता. मात्र, असे असले तरी आता धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडेंच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे.