Corona Updates : मंत्रालयचं झालंय कोरोनाचा हॉटस्पॉट ? सलग सुट्यानंतर मंत्रालयात पोहोचलेल्या कर्मचारी अधिका-यांना कोरोनाच्या लाटेचा अनुभव?

मंत्रालयात गेल्या तीन दिवसांत सुटीवरून आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या बाबत माहिती घेतली असता असे सांगण्यात आले की, मागील सप्ताहात महसूल विभागात चार जणांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या.

  मुंबई : राज्यात काही शहरात कोरोनाचे रूग्ण वाढल्याने लॉकडाऊनची स्थिती असताना मुख्यमंत्र्यांनी देखील येत्या आठ दिवसांत शिस्त पाळली नाही तर राज्यात पुन्हा टाळेबंदीसारखा कठोर उपाय करावा लागण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज तीन दिवसांच्या सलग सुट्यानंतर मंत्रालयात पोहोचलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना कोरोनाच्या लाटेचा अनुभव आल्याने खळबळ माजली आहे.

  २५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

  मंत्रालयात गेल्या तीन दिवसांत सुटीवरून आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या बाबत माहिती घेतली असता असे सांगण्यात आले की, मागील सप्ताहात महसूल विभागात चार जणांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सावधगिरीचा उपाय म्हणून अनेक कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांच्या सुटीच्या काळात चाचण्या केल्या असता त्यात २५ जणांचा अहवाल सकारात्मक आला आहे.

  अनेकांना अहवालाची प्रतिक्षा

  यामध्ये महसूल विभागातील २ उपसचिव, ४ अवर सचिव, ३ कक्ष अधिकारी ४ सहायक कक्ष अधिकारी तसेच सुमारे सात ते आठ लिपिकांची देखील कोरोनाची चाचणी केली असता त्यांचे अहवाल सकारात्मक दिसून आले आहेत. अजूनही अनेकांना अहवालाची प्रतिक्षा असून मंत्रालयात कोरोनाची लाट आल्यासारखी स्थिती त्यातून समोर येण्याची चिन्हे आहेत अशी माहिती या विभागातील सूत्रांनी दिली.

  मंत्रालय कोरोनाचा हॉटस्पॉट

  महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनंतर कोरोनाची ही लाट आता शालेय शिक्षण खात्यात देखील पसरली असल्याचे सांगण्यात येत असून तेथे १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्रालयात राज्याचे मुख्यालय असल्याने राज्यभरातून जनता येत असते त्यांच्या विवीध विभागातील कामांसाठी दिवसभर वर्दळ असते त्यामुळे मंत्रालयात आता कोरोनाचा हॉटस्पॉट जाहीर करण्याची स्थिती येवू शकते अशी शक्यता आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

  येत्या आठ दिवसांनंतर अर्थ संकल्पीय अधिवेशन असून त्याच्या तयारीची लगबग सध्या मंत्रालयात सुरू आहे. तसेच मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने नेहमीच या महिन्यात मंत्रालयात गर्दीचा माहोल असतो मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता सर्वानाच काळजी घेण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे