कोरोनाने केलाय शिक्षणाचा खेळखंडोबा, अभ्यास करण्याऐवजी बारावीच्या विद्यार्थ्यांचे आझाद मैदानात आंदोलन; परीक्षा ऑनलाईन घेण्यावर विद्यार्थी ठाम

राज्यातील काेराेनाच्या वाढत्या संख्येमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात येत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास एप्रिल-मे महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेदरम्यान लॉकडाऊनमुळे आम्हाला घरातून बाहेर पडणे शक्य होणार नाही. परिणामी परीक्षा देता येणार नाही. त्याचप्रमाणे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या.

    मुंबई: बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ठाम असताना रविवारी राज्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन केले. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे ठिकठिकाणी होत असलेल्या लॉकडाऊनमुळे परीक्षा पुढे ढकलल्यास त्याचा मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा ऑफलाईनऐवजी ऑनलाईच घेण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी रविवारी केली. त्याचप्रमाणे ऑनलाई शिक्षणामुळे अभ्यासच झाला नसल्याने अंतर्गत मूल्यांकनाचा पर्यायही विद्यार्थ्यांकडून शिक्षणमंत्र्यांचा सूचवण्यात आला आहे. परीक्षेसंदर्भात योग्य विचार न केल्यास आणखी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला.

    राज्यातील काेराेनाच्या वाढत्या संख्येमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात येत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास एप्रिल-मे महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेदरम्यान लॉकडाऊनमुळे आम्हाला घरातून बाहेर पडणे शक्य होणार नाही. परिणामी परीक्षा देता येणार नाही. त्याचप्रमाणे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. तर आम्हाला अधिक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे परीक्षा ऑनलाईनच घेण्यात यावी, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकवण्यात आला, प्रिलियम्स ऑनलाईन घेण्यात आल्या, महाविद्यालय स्तरावरील परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या. मग आमच्या परीक्षा ऑनलाईन का घेण्यात येत नाही, असा प्रश्नही विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित केला.

    साेमवारी हाेणार शिक्षण अधिकाऱ्यांसाेबत विद्यार्थ्यांची बैठक

    परीक्षा ऑनलाईन घेणे शक्य नसेल तर आतापर्यंत शाळांमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांच्या माध्यमातून अंतर्गत मूल्यांकन करण्यात यावे, असा पर्यायही विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित केला. तामिळनाडू सरकारने विद्यार्थ्यांच्या मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला असताना महाराष्ट्र सरकार परीक्षेसाठी आग्रही का असा मुद्दाही यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. आपली बाजू सरकारकडे मांडण्यासाठी रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास दहावी व बारावीचे जवळपास ४०० ते ५०० विद्यार्थी आझाद मैदानावर जमा झाले होते. मात्र रविवार असल्याने मंत्रिमंडळ व संबंधित अधिकारी यांच्यासमवेत बैठक होणे शक्य नसल्याने त्यांची उद्या बैठक निश्चित करण्याचे आश्वासन पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

    विद्यार्थ्यांनी विविध पर्याय उपस्थित केले

    ऑफलाईन परीक्षेबाबत सरकार ठाम असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा घेण्यासंदर्भातील काही सूचनाही सरकारला केल्या आहेत. यामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ फायचा पर्याय देण्यात यावा, वस्तूनिष्ठ प्रश्नांची संख्या वाढवण्यात यावी. त्याचप्रमाणे दोन पेपरमध्ये अंतर ठेवण्यात याव्यात. त्याचप्रमाणे ५० गुणांची ऑफलाईन परीक्षा तर ५० गुण हे अंतर्गत मूल्यांकनावर देण्यात यावे असे विविध पर्यायही विद्यार्थ्यांनी उपस्थित केले.

    सेल्फ सेंटर नको होम सेंटर द्या

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना सेल्फ सेंटरचा पर्याय दिला आहे. म्हणजे ते ज्या शाळा किंवा महाविद्यालयामध्ये शिकत आहेत. त्याच संस्थेमध्ये परीक्षेचे केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय न बदलल्यास सेल्फ सेंटर नको होम सेंटर द्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. अनेक विद्यार्थी हे सध्या गावाकडे असल्याने त्यांना परीक्षा देण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे सारख्या शहरांमध्ये यावे लागेल. हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या विद्यार्थ्यांची यामुळे गैरसोय होईल, तसेच परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी प्रवास करणे हे धोकादायक असल्याचे म्हणणे विद्यार्थ्यांनी मांडले.

    नीट, जेईईची तयारी कधी करायची?

    वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे परीक्षा पुढे ढकलली गेल्यास गतवर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अनेकांना नीट, जेईईची परीक्षा द्यायची असते. बारावीची परीक्षा विलंबाने झाल्यास त्याचा परिणाम या परीक्षांच्या तयारीवर होण्याची भितीसुद्धा विद्यार्थ्यांकडून वर्तवण्यात आली.