corona

मुंबई : राज्य सरकारने माझे कुटूंब माझी जबाबदारी अभियान घेवून लोकांनी मास्क सक्तिने वापरावा असा प्रयत्न सुरू केला आहे. मास्क न वापरणा-यांना दंडाची मोठ्या प्रमाणात राज्यात आकारणी सुरू झाली आहे. मात्र लोकांनी वापरू नये यासाठी अखिल भारतीय स्वास्थ्य अभियानाकडून मरीन ड्राईव्ह येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी अनेक तरुण-तरुणींनी एकत्र येत मास्क न घालताच आंदोलन केले. यावेळी त्यांनी मुंबईकरांना मास्क फ्री जगू द्या, अशी मागणी मांडली. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, कोविड-१९ एक अपप्रचार आहे. हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. या माध्यमातून लोकांची मोठी फसवणूक होत आहे. लोकांना घाबरवले जात आहे. लोक घाबरतात आणि त्यामुळे मास्क वापरतात. परंतु सतत मास्क वापरल्याने कार्बन डायऑक्साईड हा वायू शरीरात जातो. त्यामुळे यकृत खराब होते. कॅन्सरही होऊ शकतो. यकृत स्वस्थ ठेवण्यासाठी लोकांनी मास्क वापरणे बंद केले पाहीजे. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, घरगुती अन्नसेवनानेच कोरोनावर मात करता येईल. परंतु लोकांच्या मनात भीती पेरून आयटी कंपन्या आणि अमेरिकेसारखे देश स्वहित पाहत आहेत. पोस्टर्सच्या माध्यमातून त्यांनी सांगितले की, आपल्याला पुन्हा टाळेबंदीची गरज नाही. कोरोनावरील लस, मास्क, कॅशलेस सेवा यापैकी कशाचीही गरज नाही.

जर मास्कने कोरोनाला रोखता येते तर मग सहा फुटांपर्यंतचे फिजिकल डिस्टन्स कशाला? फिजिकल डिस्टन्स पाळून कोरोनापासून बचाव करता येत असेल तर मास्क कशाला? मास्क आणि फिजिकल डिस्टन्स पाळून कोरोनाला रोखता येत असेल तर टाळेबंदीची गरज काय? मास्क फिजिकल डिस्टन्स आणि लॉकडाऊन या तिन्ही गोष्टी कोरोनाला थोपवू शकतात तर मग लस कशाला हवी? असे अनेक प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केले आहेत.