राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवारांशी राज्यातील महामंडळांवरील नियुक्त्यांसंदर्भात चर्चा केली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असून महामंडळांवरील नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

    मुंबई : राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवारांशी राज्यातील महामंडळांवरील नियुक्त्यांसंदर्भात चर्चा केली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असून महामंडळांवरील नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

    थोरात यांनी पवारांशी महामंडळ आणि समित्यांचे गठन करण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून याबाबतची माहिती दिली. पवार ज्येष्ठ नेते आहेत, ते मार्गदर्शक आहेत. त्यांच्याशी आम्ही नेहमीच चर्चा करत असतो. तशीच आजही चर्चा केली. अनेक महामंडळांच्या नियुक्त्या बाकी आहेत. राज्य पातळीवर समित्यांचे गठन व्हायचे आहे. त्यावर त्यांच्याशी चर्चा केली. तसेच राज्यात अनेक प्रश्न असतात. त्यातील दहा बारा प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असतात. या सर्वांवर या निमित्ताने चर्चा झाली, असे थोरात म्हणाले.

    राज्यातील महामंडळांची संख्या मोठी आहे. या महामंडळाच्या अध्यक्षांना कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा दर्जा असतो. त्यामुळे मंत्रिपद न मिळालेले आमदार आणि इतर कार्यकर्ते महामंडळ मिळवण्यासाठी लॉबिंग करत असतात. सर्वच कार्यकर्त्यांना महामंडळ देणे शक्य नसल्याने अनेकांची नाराजीही ओढवली जाते. त्यातून पक्षांतर्गत बंडाळी निर्माण होते. त्यामुळे महामंडळाच्या नियुक्त्या नेहमीच रखडल्या जातात. यावेळी राज्यात तीन पक्षाचं सरकार आल्यानंतर हे सरकार स्थिर स्थावर होत नाही तोच कोरोनाचं संकट आलं. त्यात दीड वर्षे गेल्याने महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्या होत्या.

    हे सुद्धा वाचा