Covid test mandatory for taxi, rickshaw pullers; Special testing camp by the municipality

मुंबईसह राज्यात लॉकडाऊन लागू आहे. त्यामुळे समुद्र किनारे, मॉल बंद आहेत. मात्र, टॅक्सी आणि रिक्षा सध्या मुंबईच्या रस्त्यांवर धावत आहेत. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेने शहरातील टॅक्सी-रिक्षा चालकांच्या कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत नुकतेच पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना झालेल्या बैठकीत तशा सूचना दिल्या आहेत.

    मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या घटकांकडे मुंबई महानगरपालिकेने मोर्चा वळवला आहे. त्यानुसार आता मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांचीही कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता टॅक्सी आणि रिक्षा चालकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

    कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर उपायोजना करण्यात येत आहेत. कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याने गर्दीच्या ठिकाणी दररोज ५० हजार चाचण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार शहरातील समुद्र किनारे, मॉल, खाऊगल्ल्या अशा सार्वजनिक ठिकाणी चाचण्या करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. त्यानुसार चाचण्याही केल्या जात आहेत.

    मात्र, आता मुंबईसह राज्यात लॉकडाऊन लागू आहे. त्यामुळे समुद्र किनारे, मॉल बंद आहेत. मात्र, टॅक्सी आणि रिक्षा सध्या मुंबईच्या रस्त्यांवर धावत आहेत. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेने शहरातील टॅक्सी-रिक्षा चालकांच्या कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत नुकतेच पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना झालेल्या बैठकीत तशा सूचना दिल्या आहेत.

    मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुंबईत धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालक हे दररोज प्रवाशांच्या संपर्कात येतात. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांचे आरोग्य धोक्यात येण्याचे चिन्ह जास्त आहे. त्यामुळे मुंबईतील रिक्षा, टॅक्सी चालकांचीही चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच चालक कोरोनाबाधित आढळल्यानंतर तात्काळ कुटुंबीयांतील सदस्यांचीही चाचणी होणार आहे.

    तसेच मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांना पालिकेकडून चाचणीसाठी शिबीरे घेण्यात येतील. हे शिबीर रिक्षा, टॅक्सी स्टॅण्ड, रेल्वे स्थानकाबाहेर घेण्यात येणार आहे. चालकांना कोणतीही सक्ती केली जाणार नाही. मात्र, आम्ही मुंबईतील टॅक्सी-रिक्षा पालकांना आवाहन करतो की, त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन कोरोना चाचणी करावी.