”कोविड’ उपाययोजनांमध्ये सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेणार

मुंबई : ‘कोरोना कोविड १९' या संसर्गजन्य बाधितांचे प्रमाण महापालिकेच्या काही विभागांच्या क्षेत्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर

 मुंबई : ‘कोरोना कोविड १९’ या संसर्गजन्य  बाधितांचे प्रमाण महापालिकेच्या काही विभागांच्या क्षेत्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये  वाढत असल्याच्या    पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त  इकबाल सिंह चहल यांनी आता सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. इमारती, सोसायट्यांमधील पदाधिकाऱ्यांना कोविडच्या उपाययोजनांमध्ये सहभागी करून त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी टाकली जाणार आहे. यापुढे सोसायटीच्या स्तरावरच प्रतिबंधात्मक उपाययोजनासंदर्भातील  नियोजन आणि अंमलबजावणीत महत्वाची भूमिका सोपवली जाणार आहे. त्यादृष्टीकोनातून महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्व विभागीय सहायक आयुक्तांना निर्देश दिले आहेत.

बृहन्मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातून दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष बैठकीदरम्यान महापालिका आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. या बैठकीला महापालिकेच्या अतिवरिष्ठ अधिका-यांसह राज्य शासनातील सहकारी गृहनिर्माण संस्थाविषयक संबंधित उपनिबंधक देखील उपस्थित होते. 

‘कोविड कोरोना १९’ या संसर्गजन्य आजाराच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सर्वस्तरीय प्रयत्न सातत्याने करित आहे. यामध्ये नागरिकांद्वारे करण्यात येणा-या प्रयत्नांची परिणामकारकता अत्यंत महत्त्वाची आहे. याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे प्रभावी जाणीवजागृती करिता नियमितपणे प्रयत्न करण्यात येत असून यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. याच श्रृंखलेत आता प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रातील सोसायटींच्या पदाधिका-यांना सहभागी करून घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना आज दिले आहेत.