तूर्तास कोविड रुग्णांसाठी खाजगी रुग्णालयातील खाटा कमी करणार नाही; उच्च न्यायालयात राज्य सरकारची माहिती

कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत होणारी घट पाहता खाजगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी ५० टक्के खाटा आरक्षित ठेवण्याची अट राज्य सरकारने रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका इंडियन मेडिकल असोसिएशनमार्फत दाखल करण्यात आली आहे.

    मुंबई : मागील काही दिवसांपासून कमी झालेली रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढायला लागली आहे. त्यानुषंगाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यात व्हेंटिलेटरसह आयसीयु खाटांची संख्या याआधीच कमी आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयातील आयसीयू आणि व्हेंटिलेटरसह आयसीयूतील विशिष्ट खाटा कोविडसाठी आरक्षित ठेवणे गरजेचे असून खाजगी रुग्णालयातील या खाटा कमी करण्याबाबत कोणताही विचार नसल्याची माहिती सोमवारी उच्च न्यायालयात राज्य सरकारच्यावतीने देण्यात आली.

    कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत होणारी घट पाहता खाजगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी ५० टक्के खाटा आरक्षित ठेवण्याची अट राज्य सरकारने रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका इंडियन मेडिकल असोसिएशनमार्फत दाखल करण्यात आली आहे. त्यावर सोमवारी न्या. शाहरुख काथावाला आणि न्या. विनय जोशी यांच्या चेंबरमध्ये सुनावणी पार पडली.

    खाजगी रुग्णालयातील खाटांच्या आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी तसेच आयुक्तांना यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्यात ८० टक्के आरक्षणावरून खाटांची संख्या ५० टक्क्यांवर आणली जाणार आहे. मात्र पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तूर्तास ‘ जैसे थे ‘ परिस्थिती ठेवण्यात येणार आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली तर खाटाची संख्या कमी करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल आणि त्याबाबत खाजगी रुग्णालयांना सूचनाही दिल्या जातील, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने ॲड. ज्योती चव्हाण यांच्या वतीने देण्यात आली. त्याची दखल घेत खंडपीठाने सुनावणी १५ दिवसांसाठी तहकूब केली.