शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट, आता ‘या’ तारखेपर्यंत पावसासाठी पाहावी लागणार वाट

जूनमध्ये महाराष्ट्रात धडकलेला मान्सून अवघ्या काही दिवसातच दडी मारून बसल्याचं चित्र पाहायला मिळालं. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी आताच्या घडीला मोठ्या संकटात सापडल्याचे पाहायला मिळत आहे.

    मुंबई : महाराष्ट्रामध्ये जून महिन्याचा सुरुवातीलाच मान्सूनचं जोरदार आगमन झालं. जूनमध्ये महाराष्ट्रात धडकलेला मान्सून अवघ्या काही दिवसातच दडी मारून बसल्याचं चित्र पाहायला मिळालं. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी आताच्या घडीला मोठ्या संकटात सापडल्याचे पाहायला मिळत आहे.

    शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट

    पावसाच्या आशेवर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यातच हवामान विभागाकडून सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दरम्यान, राज्यात मान्सूनच्या सुरुवातीलाच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळालं.

    पण त्यानंतर मात्र पावसाने दगा दिला. सध्या महाराष्ट्रात 10 जुलैपर्यंत पावसासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे हवामान साधारण राहील. तसेच 15 जुलै नंतर राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होईल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता पेरणी केलेले शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

    तसेचं जुलै महिन्यात पाऊस येईल या आशेवर अनेक जण होते. त्यातच जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजामुळे शेतकर्‍यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकरी राजाला आणखी किती अडचणींचा सामना करावा लागणार? असा प्रश्न पडला आहे.