‘अभ्यास’ न करताच माझ्यावर टीका केली, फडणवीसांच्या उत्तराला रोहित पवारांचे प्रत्युत्तर

रोहित पवारांनी प्रत्युत्तर देत सविस्तर उत्तर फेसबुकवर पोस्ट केले आहे. या मध्ये रोहित पवार म्हणाले आहेत की, रोहित पवारांना कॅलक्यूलेशन समजत नाही, त्यांनी अभ्यास करुन बोलावं अशी फडणवीस यांनी रोहित पवारांवर टीका केली होती. ही बातमी रोहित पवारांनी पाहिली आणि त्यावर प्रत्युत्तर देत म्हणाले नेहमी अभ्यास करणाऱ्या नेत्याने अभ्यास न करताच माझ्यावर टीका केली याचे मला आश्चर्य वाटत आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जीएसटीच्या थकबाकीवरुन आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी जुंपल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांच्या टीकेला उत्तर दिले. यावर रोहित पवारांनी फडणवीस यांच्या उत्तराला सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. (Rohit Pawar’s reply to Fadnavis)

रोहित पवारांनी प्रत्युत्तर देत सविस्तर उत्तर फेसबुकवर पोस्ट केले आहे. या मध्ये रोहित पवार म्हणाले आहेत की, रोहित पवारांना कॅलक्यूलेशन समजत नाही, त्यांनी अभ्यास करुन बोलावं अशी फडणवीस यांनी रोहित पवारांवर टीका केली होती. ही बातमी रोहित पवारांनी पाहिली आणि त्यावर प्रत्युत्तर देत म्हणाले नेहमी अभ्यास करणाऱ्या नेत्याने अभ्यास न करताच माझ्यावर टीका केली याचे मला आश्चर्य वाटत आहे. परंतु ठीक आहे ते बिहारच्या निवडणुकीत व्यस्त असल्यामुळे अभ्यास केला नसावा, म्हणूनच त्यांनी टीका केली असावी. परंतु एक गोष्ट खरीय की माझा त्यांच्याएवढा अभ्यास नाही आहे.

परंतु मी वस्तुस्थिती मांडली तसेच माझ्या कॅलक्युलेशनचे पुन्हा एकदा स्पष्टीकरण देतो. ते देत असताना नाराजीतून किंवा माझ्याविरोधात कोणी बोललं म्हणून नाही तर वस्तुस्थिती समोर यावी आणि शाब्दिक खेळ आणि राजकीय टीकाटिप्पणी होऊ नये म्हणून स्पष्टीकरण देत आहे.

जीएसटीच्या पैशाबाबत मांडलेल्या मतावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, दर दोन महिन्यांनी जीएसटी भरपाई राज्यांना देणं गरजेचं असतानाही केंद्र सरकार मात्र खूप उशिराने देतं. ऑक्टोबर -नोव्हेंबर २०१९ ची भरपाई डिसेंबर एवजी फेब्रुवारी मध्ये एक टप्पा तर मे मध्ये दुसरा टप्पा अशी दिली गेली. डिसेंबर २०१९ व जाने-फेब्रु २०२० ची भरपाई जून महिन्यात मिळाली. मार्च २०२० ची भरपाई जुलैमध्ये मिळाली तर २०२०-२१ च्या एप्रिल, मे. जून, जुलै या चार महिन्यांची भरपाई अद्यापही मिळाली नाही. केंद्राकडून जीएसटी देण्यात होणारी दिरंगाई त्यांना कळायला हवी होती.


गेल्या महिन्यात केंद्र सरकारने जीएसटी भरपाई पोटी संचित निधी मधून ३३४१२ कोटी रु दिल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं, मात्र ७५,००० कोटी रु संचित निधीमधून दिल्याचं विरोधी पक्षनेत्यांनी ठोकून दिलं. याला काय म्हणावं त्यांना एक सांगायचंय की व्यक्तीगत हीत हे पक्षहितापेक्षा वरचढ व्हायला नको, अन्यथा सत्ता जाते. आणि पक्षहीत राज्याच्या हितापेक्षा वरचढ अन्यथा आर्थिक संकटात लोटलं जातं.

पुढे रोहित पवार म्हणाले की, मला या विषयाचं राजकारण करायचं नाही. किंवा करायची इच्छाही नाही. परंतु आज राज्याची तिजोरी रिकामी आहे. केंद्र सरकारकडून भरपाई देताना अनेक महिने उशीर होतोय. राज्यांसमोर मोठं आर्थिक संकट आहे. अशा काळात दुसऱ्याच्या चुका शोधत न बसता आपण केलेली चूक सुधारण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे वेळेत जीएसटी भरपाई देण्याची व स्थानिक संस्था करापोटी माफ केलेली रक्कम आधारभूत महलुसात परिगणित करण्याची मागणी त्यांनी केंद्राकडे लावून धरावी आणि ती मान्य करुन घ्यावी.

तसेच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने राज्यांना कर्ज घ्यायला सांगितलं. वास्तविक केंद्राच्या या भूमिकेला फडणवीस जी यांनीच विरोध करायला हवा होता. कारण राज्याचं मुख्यमंत्री पद त्यांनी सांभाळलंय. त्यांना उत्पन्नाची संपूर्ण माहिती आहे. पण तरीही त्यांनी विरोध केला नाही. पण त्यांच्याच पक्षाच्या बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांनी मात्र सरकारला विरोध केला. राज्याला कर्जाच्या खाईत ढकलायचं नसेल तर राज्याच्या हितासाठी बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांसारखी फडणवीस यांनीही धाडस दाखवावं. लोक त्यांच स्वागतच करतील. असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.