क्रुझ ड्रग्स पार्टी: आर्यनसह 8 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; जामीनाचा मार्ग मोकळा

  मुंबई : क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केला अहवाल अस्पष्ट असल्याचे निरीक्षण नोंदवत मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा(Aryan Khan ) मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचासह अन्य पाच जणांना एनसीबी कोठडी देण्यास नकार दिला आणि आठही जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

  मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या आलिशान क्रूझ सफारीवर क्रूझवरून कोकेन, चरस, हशीश, एमडी, एमडीएमए जप्त केला. तसेच यावेळी अनेक बड्या घरातील मुलांना ताब्यात घेतले होते.

  मागील सुनावणीदरम्यान आर्यनची एनसीबी कोठडी गुरुवारी संपकत असल्याने त्याला गुरुवारी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर.एम. नेर्लीकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. तेव्हा, आरोपीच्या कोठडीची मागणी एनसीबीकून करण्यात आली. तसेच सर्व आरोपींची एकत्र चौकशी आवश्यक आहे. एक तपास यंत्रणा म्हणून आम्ही योग्य प्रक्रियेचे पालन करत असल्याचा दावा एसीबीच्यावतीने अनिस सिंग यांनी केला. त्याला आर्यनचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी तीव्र विरोध केला.

  आर्यनची अटक ही बेकायदेशीर आणि अनावश्यक आहे. त्याच्याविरोधात कोणताही पुरावा तपास यंत्रणेला सापडलेला नाही. जोपर्यंत मुख्य आरोपीपर्यंत पोहोचत नाही अथवा तो सापडत नाही. तोपर्यंत आर्यनला ओलीस ठेवणार आहेत का असा सवालही अॅड. सतीश मानेशिंदे यांनी उपस्थित केला. दोन्ही बाजू ऐकून घेत आरोपींना कारणाशिवाय एनसीबी कोठडीत पाठविणे हे त्यांच्या स्वातंत्र्याचा भंग कऱण्यासारखे आहे असे स्पष्ट करत न्यायालयाने आरोपींना एनसीबी कोठडी नाकारत त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

  न्यायालयीन कोठडी सुनविताच आर्यन खानच्यावतीने जामीनासाठी अर्ज दाखल कऱण्यात आला असून त्यावर न्यायालयाने शुक्रवारी सकाळी सुनावणी होणार आहे.

  आर्यनला न्यायालयीन कोठडी सुनविण्यात आली असली तरीही त्याची कोरोनाची चाचणी झाली नसल्यामुळे कारागृहात संध्याकाळी 6 नंतर आरोपींना प्रवेश देण्यात येत नाही. त्यामुळे आर्यनला गुरुवारची रात्रही एऩसीबी कोठडीतच घालवावी लागणार असल्याची चर्चा आहे.