शाकाहारी आणि धुम्रपान करणाऱ्या लोकांना कोविड-१९चा धोका कमी असल्याचा ‘सीएसआयआर’च्या पाहणीतील निष्कर्ष

राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या या अभ्यासामध्ये १४० डॉक्टर आणि संशोधन शास्त्रज्ञांचा एक चमू सहभागी झाला होता.त्यांनी कोरोना विषाणूविरोधी लढण्यासाठी आवश्यक प्रतीपिंडे (अँटी बॉडीज), कोरोना विषाणू आणि कोणत्या व्यक्तीमध्ये त्यांचा प्रतिकार करण्याची अधिक क्षमता असते याचा अभ्यास केला.

  • अशाच प्रकारचा निष्कर्ष अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, इटली आणि चीनमधील स्वतंत्र पाहण्यांमध्येही

मुंबई : केंद्र सरकारच्या ‘कौन्सिल ऑफ सायंटीफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च अर्थात ‘सीएसआयआर’ने केलेल्या अलीकडील पाहणीमध्ये धुम्रपान करणारे आणि शाकाहारी लोकांमध्ये कोविड-१९चा प्रादुर्भाव तुलनेने कमी होत असल्याचे समोर आले आहे. कोविड-१९ हा श्वसनविषयक रोग असूनही धुम्रपान हे संरक्षक ठरत असावे कारण त्या माध्यमातून धुम्रपान करणाऱ्याच्या शरीरातशेंबडाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. त्याद्वारे त्या व्यक्तीचे विषाणूच्या प्रादुर्भावापासून प्राथमिक संरक्षण होत असावे, असे यात म्हटले आहे. या पाहणीमध्ये शाकाहारींमध्ये फायबरचे प्रमाण मोठे असल्याने त्यातून दाह कमी करत आतड्यांना सशक्तपणा येत असल्याने त्याद्वारे कोविड-१९शी लढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोग प्रतिकारकशक्ती प्राप्त होते, असेही नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या या अभ्यासामध्ये १४० डॉक्टर आणि संशोधन शास्त्रज्ञांचा एक चमू सहभागी झाला होता.त्यांनी कोरोना विषाणूविरोधी लढण्यासाठी आवश्यक प्रतीपिंडे (अँटी बॉडीज), कोरोना विषाणू आणि कोणत्या व्यक्तीमध्ये त्यांचा प्रतिकार करण्याची अधिक क्षमता असते याचा अभ्यास केला. या अभ्यासामध्ये‘सीएसआयआर’च्या ४० प्रयोगशाळामधील लोक व त्यांच्या परीजनांमधील १०,४२७ लोकांचे सर्वेक्षण त्यांच्या अनुमतीने केले गेले.

या सर्वेक्षणामध्ये असेही आढळून आले की, ज्यांचा रक्तगट‘ओ’ आहे त्यांना कोविड संक्रमणाचा कमी धोका संभवतो तर ‘बी’ किंवा ‘एबी’ रक्तगट असलेल्यांमध्ये हा धोका अधिक असतो.

याआधी इटली, न्यूयॉर्क आणि चीन येथे करण्यात आलेल्या दोन इतर सर्वेक्षणांमध्येसुद्धा धुम्रपानाबाबत असेच निष्कर्ष निघाले होते. अमेरिकेच्या ‘सेन्टर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन(सीडीसी)’ने कोविड-१९ झालेल्या ७००० लोकांचे सर्वेक्षण केले आणि त्यातूनही धुम्रपान करणाऱ्यांमध्ये संसर्ग कमी होतो, असाच निष्कर्ष निघाला. अमेरिकेतील १४टक्के लोकसंख्या धुम्रपान करत असूनही संसर्ग झालेल्यांमध्ये केवळ १.३ टक्के लोकच धुम्रपान करणारे होते,असे या पाहणीत आढळून आले आहे. इंग्लंडमध्ये १४.४ टक्के लोक धुम्रपान करत असले तरी कोविड-१९ झालेल्यांमध्ये केवळ एक तृतीयांश लोकच धुम्रपान करणारे होते, असे ‘युनिव्हर्सीटी कॉलेज लंडन’च्या एका पाहणीत आढळून आले आहे. चीन, फ्रान्स या देशांच्या बाबतीत झालेल्या अभ्यासांमधूनसुद्धा असेच निष्कर्ष पुढे आले आहेत.

‘जीन-जीन झांग’ने कोविड-१९ चा धुम्रपान करणाऱ्यावर होणारा परिणाम यावर केलेल्या एका पाहणीत असे आढळून आले आहे की, केवळ ९ किंवा ६.४ टक्के  लोकांमध्ये धुम्रपानाचा पूर्वेतिहास होता आणि त्यातील सात ही खूप पूर्वी धुम्रपान करायचे.

पाहणी अहवालामध्ये पुढे असेही इशारा वजा प्रतिपादन करण्यात आले आहे की, धुम्रपान आणि त्यातून शरीरात जाणाऱ्या निकोटीनचा कोरोना विषाणूवर जो परिणाम होतो, त्याचा अधिक सखोल यांत्रिकीरित्या अभ्यास करण्याची गरज आहे. “धुम्रपानाचा शरीरारावर खोलवर परिणाम होत असतो आणि त्यातून अनेक रोगही उद्भवतात. त्यामुळे या पाहणीतील निष्कर्ष चुकीच्या पद्धतीने घेणे चुकीचे ठरेल. खासकरून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम सिद्ध झालेले असताना हे घातक ठरू शकते,” असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र या निष्कर्ष दस्तावेजांमध्ये शाकाहारामध्ये अधिक प्रमाणात फायबर असल्याने त्याचा फायदा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी होत असल्याची दाट शक्यता असल्याचे नमूद केले गेले आहे.