एसटीत होणार हा बदल; दोन आसनांमध्ये येणार पडदे

सध्या ५० टक्के प्रवासी क्षमतेने धावणारी एसटी पूर्ण प्रवासी क्षमतेने चालवण्यासाठी महामंडळाने दोन आसनांमध्ये आता पडदे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची चाचपणी एसटीच्या दापोडी येथील कार्यशाळेत सुरू होणार असल्याची माहिती महामंडळाने दिली.

मुंबई : एसटी महामंडळाकडून जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बस चालवताना ४४ ऐवजी २२ प्रवाशांनाच प्रवासाची मुभा दिली आहे. यामुळे आधीच तोट्यात चालणाऱ्या एसटीचे उत्पन्न आणखीनच कमी झाले आहे. ही परिस्थिती पुढेही अशीच सुरू राहिल्यास आर्थिक नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पन्न वाढावे व खर्च बचतीसाठी यावर उपाय म्हणून पूर्ण प्रवासी क्षमतेने एसटी चालवण्याच्या विचारात महामंडळ आहे. त्यासाठी दोन आसनांवर बाजूबाजूला बसलेल्या प्रवाशांमध्ये पडदे बसवण्यात येणार आहेत.

यासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी हा प्रस्ताव गेल्या आठवडय़ात राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे दोन बसमध्ये पडदे बसवण्यात आले असून राज्य सरकारकडून मंजुरी मिळताच त्याची चाचपणी केली जाणार असल्याचे सांगितले.

बचत करण्याचा महामंडळाचा प्रयत्न

टाळेबंदीआधी एसटीच्या १८ हजार बसमधून दररोज ६० ते ६५ लाख प्रवासी प्रवास करत असल्याने त्यातून दररोज २१ ते २२ कोटी रुपये उत्पन्नही मिळत होते. परंतु गेल्या पाच महिन्यांत हेच उत्पन्न पूर्णपणे बुडाले. त्यामुळे एसटी पूर्ण क्षमतेने चालवतानाच खर्चातही बचत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

देखभालीचे काय?

करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बेस्ट, रिक्षामध्ये प्रवासी व चालकांच्या मध्ये प्लास्टिक शिट्स बसविले जात असतानाच एसटीत पडदे बसविण्यामागील नेमका उद्देश काय, एसटी गाडय़ांच्या स्वच्छतेबाबत प्रश्न होत असतानाच या पडद्यांची देखभालही होईल का असाही प्रश्न असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले.