डी.डी. सह्याद्रीवर भरणार विद्यार्थ्यांची शाळा ; पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची संधी

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी पुढील काही महिन्यांमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे यंदाही शाळा ऑनलाईनच सुरू होणार आहेत. राज्यात लागू असलेल्या विविध निर्बंधामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध होण्याची शक्यताही कमी आहे.

    मुंबई : राज्यामध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे विविध निर्बंध लागू केले आहेत. यामुळे राज्यातील शाळा १५ जूनपासून ऑनलाईन सुरू करण्यात येणार आहेत. मात्र प्रत्यक्षात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे ‘ज्ञानगंगा’ या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीवरून १४ जूनपासून सोमवार ते शुक्रवारदरम्यान दररोज पाच तास इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज आपल्या अभ्यास नियमितपणे करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

    राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी पुढील काही महिन्यांमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे यंदाही शाळा ऑनलाईनच सुरू होणार आहेत. राज्यात लागू असलेल्या विविध निर्बंधामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध होण्याची शक्यताही कमी आहे.

    त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून विद्यार्थ्यांसाठी डी.डी सह्याद्री वाहिनीवरून १४ जूनपासून सोमवार ते शुक्रवारदरम्यान दररोज पाच तास इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हे प्रक्षेपण सकाळी ७ : ३० ते दुपारी ३ : ३० या वेळेमध्ये होणार आहे. डी.डी. सह्याद्री वाहिनीवर काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता हे प्रक्षेपण होणार आहे.

    प्रथम टप्प्यामध्ये इयत्ता दहावी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता बारावीच्या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरु करण्यात येत आहे. उर्वरित इयत्तांच्या तासिकांचे प्रक्षेपण लवकरच सुरु करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या शैक्षणिक कार्यक्रमाच्या दैनिक प्रसारणाचे सविस्तर वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.

    डी.डी. सह्याद्रीचे डिशवरील चॅनेल क्रमांक

    डी.डी. सह्याद्री वाहिनी प्रक्षेपित होत असलेल्या डीडी फ्रेश डिश – ५२५, डिश टिव्ही – १२२९, व्हिडिओकॉन डी२एच – ७६९, टाटा स्काय – १२७४, हॅथवे – ५१३ या चॅनेल क्रमांकावर विद्यार्थ्याना शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहता येईल.