दाभोलकर-पानसरे प्रकरणातील प्रगती अहवाल बंद लिफाफ्यात सादर

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात 20 ऑगस्ट 2013 मध्ये तर 20 फेब्रुवारी 2015 मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे नेते काँम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सदर प्रकरणी एसआयटी आणि सीबीआयने तपास करून आरोपपत्र दाखल केले होते.

  • कनिष्ठ न्यायालयातील खटल्यांचा मार्ग मोकळा
  • तपास यंत्रणाकडून उच्च न्यायालयात माहिती

मुंबई, दाभोळकर-पानसरे हत्या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयातील खटल्याच्या स्थगितीसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेत असल्याचे मंगळवारी तपास यंत्रणांनी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून रखडलेले खटले पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसरीकडे, याच प्रकरणाशी निगडीत अऩ्य खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणीमध्ये एसआयटी आणि सीबीआयच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात सील बंद लिफाफ्यात प्रगती अहवाल सादर करण्यात आला.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात 20 ऑगस्ट 2013 मध्ये तर 20 फेब्रुवारी 2015 मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे नेते काँम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सदर प्रकरणी एसआयटी आणि सीबीआयने तपास करून आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर पुणे आणि कोल्हापूर येथील कनिष्ठ न्यायालयात खटला सुरू झाला. मात्र, तपास सुरू असल्याने कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांना स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज तपास यंत्रणेनेच 2016 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. त्याला या प्रकरणातील आरोपी डॉ. विरेद्र तावडे, समीर गायकवाड, शरद कळसकर यांनी आव्हान दिले होते. त्या अर्जावर मंगळवारी न्या. अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, एसआयटी आणि सीबीआय या दोन्ही तपासयंत्रणांनी खटल्याच्या स्थगितीसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेत असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे आता दाभोलकर-पानसरे प्रकरणात कनिष्ठ न्यायालयातील सुनावणी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दुसरीकडे, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कुटुंबियांनी तपासयंत्रणेच्या कारभारावर सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. दोन्ही तपासयंत्रणांकडून मंगळवारी तपासाचा प्रगती अहवाल खंडपीठासमोर सादर करण्यात आला. डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याकांडप्रकरणी मारेकऱ्यांसह सर्व आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती सीबीआयच्यावतीने खंडपीठाला देण्यात आली. तसेच खटला चालवण्यासाठी आपण तयार असल्याचेही त्यांनी खंडपीठाला सांगितले. तर कॉम्रेड पानसरे हत्येप्रकरणी अद्याप दोन आरोपी फरार असले तरीही आपण खटला चालविण्यास सज्ज असल्याचेही तपास करणाऱ्या एसआयटीने सांगितले. त्यामुळे आता लवकरच पुणे आणि कोल्हापूर सत्र न्यायालयात पुन्हा या खटल्यांवर नियमित सुनावणी सुरू होईल. सदर प्रकरणात सर्वात मोठे षडयंत्र दडलेले आहे त्यामुळे खटला सुरू राहिला तरीही या दोन्ही प्रकरणांचा तपासही समांतर सुरूच राहील असेही सीबीआय आणि एसआयटीने न्यायालयात सांगण्यात आले. त्याची दखल घेत याचिकाकर्त्यांना यासंदर्भात काही सुचना करायच्या असल्यास त्या करण्याचे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी 15 एप्रिलपर्यंत तहकूब केली.

पुरोगामी महारष्ट्रासाठी ही बाब निंदनीय (बॉक्स)

दाभोलकर-पानसरे प्रकरणात न्यायालयाने तपास यंत्रणेच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. पुरोगामी महाराष्ट्रात विचारवंताच्या अशाप्रकारे हत्या होणे आणि जवळजवळ आठ वर्षे लोटली तरीही तपासांत प्रगती न होणे ही बाब अतिशय निंदनीय असल्याचे मतही यावेळी खंडपीठाने व्यक्त केले.